नांदेड : चोरी केल्यानंतर व्यापाऱ्याची कागदपत्रे,लॅपटॉप आणि व्यवहाराची सर्व माहिती असलेली हार्ड डिस्क परत देण्यासाठी ५० लाखांची खंडणी मागणाऱ्या सहा आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने मोठ्या शिताफीने सापळा रचून पकडले़ संदीप मोहनशेठ काला यांच्या दुकानात १५ जुलैच्या रात्री चोरी झाली होती़ यावेळी चोरट्यांनी दुकानातील कागदपत्रे, लॅपटॉप आणि सर्व व्यवहाराची माहिती असलेली संगणकातील हार्ड डिस्क लंपास केली होती़ याप्रकरणी काला यांच्या तक्रारीवरुन पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हाही नोंद झाला होता़ परंतु त्यानंतर या चोरट्यांनी कागदपत्रे व हार्ड डिस्क परत करण्यासाठी काला यांना भ्रमणध्वनीवरुन संपर्क साधून ५० लाख रुपयांची मागणी केली़ सलग दोन दिवस सदरील चोरट्यांनी काला यांच्याकडे पैशाची मागणी केली़ त्यानंतर काला यांनी ही बाब पोलिस अधीक्षक परमजितसिंह दहिया यांच्या कानावर घातली़ पोलिस अधीक्षकांनी हे प्रकरण स्थानिक गुन्हे शाखेकडे दिले़ स्थागुशाच्या पथकात पोलिस निरीक्षक श्रीधर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शेख रहेमान, पोहेकॉक़त्ते, गायकवाड, जाधव, बालाजी सोनटक्के, कदम, बालाजी कोंडावार, उगले, पाचपुते यांनी आरोपींचा माग काढला़ लातूर फाट्यानजीक आरोपी येणार असल्याची माहिती पथकाला लागली़ त्यानंतर या ठिकाणी सापळा रचून सहा जणांना पकडण्यात आले़ त्यात अनिकेत ओमप्रकाश शर्मा, प्रदीप ऊर्फ सोनू यादव, सनत लालचंद रात्रे, रवी भगवानदास चौधरी, मनोज शंकरराव पतंगे, अजय लक्ष्मीकांत उदावंत व गोविंद नंदकिशोर जोशी यांचा समावेश आहे़ या सहाही आरोपींना अटक केली असून त्यांची चौकशी सुरु आहे़ दोन दिवसांत स्थागुशाला या प्रकरणाचा छडा लावण्यात यश आले आहे़ (प्रतिनिधी)
चोरीनंतर व्यापाऱ्याला मागितली खंडणी
By admin | Updated: July 20, 2014 00:28 IST