बीड : येथील जुनी भाजीमंडई भागातून एका व्यापाऱ्याचे व्याजाच्या पैशासाठी खाजगी सावकार व त्याच्या साथीदाराने शुक्रवारी रात्री गाडीत बळजबरीने कोंबून अपहरण केले. या प्रकरणी शहर ठाण्यात दोघांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेश जोगदंड (रा. राजुरी वेस, बीड) व अज्ञात एक यांचा आरोपींमध्ये समावेश आहे. बीड शहरातील व्यापारी अरुण अग्रवाल यांनी राजेश जोगदंड यांच्याकडून ४ लाख ३० हजार रुपये घेतले होते. हे पैसे व व्याज न दिल्यामुळे सावकार जोगदंड हा शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास जुनी भाजीमंडई येथील अग्रवाल यांच्या घरी गेला. जोगदंड याच्या सोबत अन्य एक व्यक्ती होती. अग्रवाल यांना बळजबरीने गाडी (एमएच-१६/१७१८) मध्ये बसवून नेले. याची माहिती कुटूंबियांनी शहर ठाण्याला दिली. त्यानंतर अरुण अग्रवाल यांचा मुलगा आशिष यांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे आशिष यांनी शहर ठाण्यात शनिवारी तक्रारी दिली. त्यावरून राजेश जोगदंड व अन्य एका विरुद्ध अपहरणासह सावकार अधिनियम कलम ४५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. तपास निरीक्षक शिवाजी सोनवणे करीत आहेत. या घटनेने शहरामध्ये खळबळ उडाली आहे. (प्रतिनिधी)
व्यापाऱ्याचे अपहरण
By admin | Updated: February 22, 2015 00:38 IST