नांदेड: मनरेगा विभागाकडे येणाऱ्या अपहार व घोटाळ्याच्या चौकशीसाठी तब्बल दोन वर्षाच्या पाठपुराव्यानंतर प्रशासनाने दक्षता पथकाची स्थापना केली़ परंतु पथकात काम करण्यास अधिकारी अनुत्सूक असून चार अधिकारी अद्यापही पथकात रूजूच झाले नाही़ दहा सदस्यीय पथक आता पाचवर आले आहे़ त्याचवेळी जिल्ह्यातील तक्रारी आलेल्या प्रकरणांची संख्याही प्रलंबितच आहे़जिल्ह्यात २०१३ पर्यंत मनरेगा अंतर्गत घोटाळ्याच्या एकुण ६३ तक्रारी आहेत़ त्यात माहूर-५, लोहा-२१, मुखेड-७, भोकर-१, नांदेड-३, कंधार-४, बिलोली-३, नायगांव-११, देगलूर-२, उमरी-१, किनवट-४ व हदगांव तालुक्यातील १ तक्रारींचा समावेश आहे़ मनरेगाअंतर्गत झालेले अपहार व घोटाळ्याची चौकशी ही दक्षता समितीमार्फत करण्यात येते़ नांदेड जिल्ह्यात मनरेगाअंतर्गत कोट्यवधींची कामे झालेली असतानाही दक्षता समिती मात्र स्थापन करण्यात आली नव्हती़ याबाबत माहिती अधिकार संघाचे जिल्हाध्यक्ष मोतीराम काळे यांनी पाठपुरावा केला़ त्यानंतर मनरेगा आयुक्तांनी दक्षता पथक स्थापन करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले होते़ त्यानंतर प्रशासनाने दहा सदस्यांचे दक्षता पथकही स्थापन केले़ त्यामुळे मनरेगामध्ये झालेले अपहार व घोटाळ्याची चौकशी होण्याची आशा निर्माण झाली होती़ परंतु या पथकातच काम करण्यास अधिकारी तयार नसल्याची बाबही समोर आली आहे़ या पथकातील एका सदस्याची नियुक्ती ही यापूर्वीच रद्द करण्यात आली आहे़ तर उर्वरित ९ पैकी ४ सदस्य हे पथकात अद्यापही रुजू झाले नाहीत़ तर एका सदस्याची इतर विभागात काम करण्यासाठी कार्यव्यवस्था करण्यात आली आहे़ रूजू न होणाऱ्यांमध्ये एस़ एऩ देशपांडे, वाय़ डी़ जाधव, जवाहर निलमवार व एल़ एस़ दहिवाल यांचा समावेश आहे़ त्यामुळे आजघडीला दहा सदस्यांचे हे पथक पाचवर आले आहे़पथकाचीच अशी वाताहत झालेली असताना, अपहार व घोटाळ्यांची चौकशी त्यांच्याकडून कशाप्रकारे होणार असा प्रश्नही आता निर्माण झाला आहे़ त्यामुळे खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनीच याकडे लक्ष देवून दक्षता समिती स्थापनेबाबत पावले उचलण्याची गरज आहे़ (प्रतिनिधी)
दक्षता पथकात सदस्यांची वाणवा
By admin | Updated: August 29, 2014 01:27 IST