लातूर : महिला व बालकल्याणचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आऱआरक़ांगणे यांच्यावर कारवाई केली नसल्यामुळे जि़प़सदस्यांनी सभात्याग करून प्रशासनाचा निषेध केला़ जि़प़अध्यक्षा प्रतिभाताई पाटील कव्हेकर यांनी सभागृहाबाहेर येऊन सदस्यांची मनधरणी केली़ परंतू कारवाई केल्याशिवाय सभागृहात येणार नाही, अशी भूमिका सदस्यांनी घेतल्याने सभा तहकूब झाली़ दरम्यान, सदस्यांनी सभागृहाबाहेर ठिय्या मांडला होता.लातूर जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात मंगळवारी जि़प़ अध्यक्षा प्रतिभाताई पाटील कव्हेकर यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा घेण्यात आली़ नऊ महिन्यांपूर्वी सभागृहात उद्धटपणे वर्तन केल्याप्रकरणी महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आऱआरक़ांगणे यांच्यावर कारवाई का केली जात नाही, असा प्रारंभीच प्रश्न उपस्थित करून सभेत गोंधळ झाला अन् सदस्य सभागृहाबाहेर आले़ जि़प़अध्यक्षांनी मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. परंतू कारवाई केल्याशिवाय सभागृहात येणार नसल्याची भूमिका सदस्यांनी घेतली़ दरम्यान, त्यांनी विलासराव देशमुख उद्यानात ठिय्या मांडला. ९ महिन्यांपूर्वी सभागृहात उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर.आर. कांगणे यांनी सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उद्धट उत्तरे देऊन सभागृहाचा अवमान केला. त्यामुळे त्यांचा पदभार काढून दुसऱ्याला देण्यात यावा, असा ठरावही करण्यात आला होता. मात्र या ठरावाची अंमलबजावणी प्रशासनाकडून झाली नसल्यामुळे सदस्य संतप्त झाले. जोपर्यंत कांगणे यांच्याकडील पदभार काढून घेतला जात नाही, तोपर्यंत आम्ही सभागृहात येणार नाही, अशी भूमिका घेत सदस्यांनी विलासराव देशमुख उद्यानात ठिय्या मांडला. (प्रतिनिधी)
जिल्हा परिषद सदस्यांचा सभात्याग
By admin | Updated: March 23, 2016 01:07 IST