लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागात वैद्यकीय प्रतिपूर्ती देयकांच्या संचिका प्रलंबित आहेत. ‘लोकमत’ने हा विषय लावून धरल्यानंतर गुरुवारी अखेर देयकांच्या संचिका असलेल्या कपाटाला शिक्षणाधिकारी (प्रा.) शशिकांत हिंगोणेकर यांनी सील लावले.आजारी शिक्षकांना वैद्यकीय प्रतिपूर्ती देयकासाठी शिक्षण विभागात खेटे मारावे लागत होते. दोन वर्षांपासून शेकडो संचिका विनाकारणण प्रलंबित ठेवल्या होत्या. यापैकी पाच शिक्षक देयकाच्या प्रतीक्षेत मृत्यू पावले होते. बुधवारी शिक्षणाधिकारी (प्रा.) शशिकांत हिंगोणेकर यांनी संचिका तपासणीचे तोंडी आदेश कार्यालयीन अधीक्षकांना दिले होते; परंतु सायंकाळपर्यंत ना तपासणी झाली ना कुठली कारवाई. दरम्यान, गुरुवारी सकाळी सीईओ नामदेव ननावरे यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना शेकडो संचिका असलेल्या कपाटास सील लावण्याचे आदेश दिले. त्यानुसार शिक्षणाधिकारी हिंगोणेकर व कार्यालयीन अधीक्षक संजय सोळसे, प्रवीण येवले यांच्या स्वाक्षरीसह सील लावण्यात आले. दस्तूरखुद्द सीईओ ननावरे हे या संचिकांची तपासणी करणार आहेत. त्यामुळे संचिका प्रलंबित असलेल्या आजारी शिक्षकांच्या देयकांचा प्रश्न लवकरच निकाली निघणार आहे. त्यामुळे शिक्षकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.अनेक शिक्षकांनी ‘लोकमत’चे धन्यवाद दिले.
वैद्यकीय देयकांचे कपाट शिक्षणाधिकाऱ्यांकडून सील
By admin | Updated: May 18, 2017 23:16 IST