अंबाजोगाई : परळी तालुक्यातील नागापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राधाकृष्ण सर्जेराव सोळंके (वय ४५) यांनी बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास स्वत:च्या कारमध्ये विषारी द्रव पिवून आत्महत्या केली.डॉ. सोळंके हे धारूर तालुक्यातील हिंगणी येथील रहिवाशी होते. बुधवारी ते आपल्या गावाहून अंबाजोगाईकडे येत होते. रस्त्यात चनई परिसरातील खडी केंद्राजवळ त्यांनी आपली कार थांबविली व स्वत:जवळील विषारी द्रव प्राशन केले. रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकाने ते गाडीत असल्याचे पाहिले. हा प्रकार त्यांना संशयास्पद वाटल्याने लोकांच्या मदतीने त्यांना बाहेर काढले.अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात त्यांना उपचारार्थ दाखल केले. परंतु उपचारापूर्वीच ते मयत झाले. डॉ. सोळंके यांनी आत्महत्या का केली ? याचे कारण समजू शकले नाही. डॉ. सोळंके यांच्या पत्नी धानोरा ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. आत्महत्येचे वृत्त कळताच नातेवाईकांनी स्वारातीकडे धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत पोलिसात नोंद नव्हती. (वार्ताहर)
वैद्यकीय अधिकाऱ्याची आत्महत्या
By admin | Updated: April 30, 2015 00:38 IST