लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मजलीस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाने शहरातील कचरा, पाणी प्रश्नावरून सोमवारपासून मनपासमोर सुरू केलेले बेमुदत उपोषण मंगळवारी एकदाचे सुटले. परंतु उपोषण सोडविण्यासाठी आलेल्या महापौरांना एमआयएमच्या नगरसेवकांनी ‘मातोश्री’चा उल्लेख करून सोडलेल्या वाक्बाणाने घायाळ केले. त्यामुळे नाराज महापौर तसेच परतण्याच्या मन:स्थितीत दिसल्याने त्यांच्या विनवण्या करण्याशिवाय एमआयएमच्या पक्षनेत्यांना गत्यंतरच राहिले नाही. याचा प्रतिशोध म्हणून महापौर व युतीच्या पदाधिकाऱ्यांनी त्या नगरसेवकास झाप झाप झापले.युतीच्या नगरसेवकांना दोन दिवसांआड पाणी देण्यात येत आहे. परंतु मुस्लिमबहुल वसाहतींवर अन्याय होत आहे. कचरा प्रश्नही सुटत नाही, अशी पोस्ट सोशल मीडियावर टाकून एमआयएमच्या नगरसेवकांनी सोमवारपासून पालिकेसमोर उपोषण सुरू केले होते. पहिल्याच दिवशी उपोषण संपेल असा अंदाज एमआयएमला होता. महापौर, आयुक्तांनी उपोषणस्थळी येऊन उपोषण सोडवावे, अशी मागणी नगरसेवकांनी केली. महापौरांनी पहिल्या दिवशी ही मागणी धुडकावून लावली. महापौरांनी मंगळवारी सायंकाळी आयुक्त, सभापतीसह जाऊन उपोषण सोडविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा एमआयएमचे नगरसेवक विकास एडके यांनी, ‘मातोश्री’चे आदेश मिळाल्याशिवाय तुम्ही कच-याची निविदा काढणार नाही का..?’ असा प्रश्न विचारला. त्यामुळे महापौर नंदकुमार घोडेले, सभापती राजू वैद्य यांचा पारा चढला. उपोषण न सोडविताच ते तेथून परतण्याच्या तयारीत असल्याचे पाहून एमआयएमच्या पक्षनेत्यांनी वारंवार विनवणी केल्यानंतर दोघे शांत झाले व त्यानंतर हे उपोषण सुटले. परंतु तत्पूर्वी या दोन्ही पदाधिका-यांनी त्या नगरसेवकास शाब्दिक टोले लगावले.