लोकमत न्यूज नेटवर्कलातूर : लातूर महानगरपालिकेवर पहिल्यांदाच झेंडा फडकविलेल्या भाजपाने महापौरपदी ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधून पक्षात आलेल्या सुरेश पवार यांना बसवून काँग्रेसला आणखी एक धक्का दिला. तर उपमहापौरपदी देविदास काळे या भाजपा निष्ठावंताला संधी दिली़ या निवडणुकीत भाजपाच्या दोन्ही उमेदवारांना ३६ तर काँग्रेस उमेदवारांना स्वत:ची ३३ व राष्ट्रवादीचे एक असे प्रत्येकी ३४ मते मिळाली. काँग्रेसचे महापौरपदाचे विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौरपदाचे उमेदवार युनूस मोमीन यांना दोन-दोन मताने पराभूत व्हावे लागले. सभागृहात एकमेव सदस्य असलेल्या राष्ट्रवादीने काँग्रेसला साथ दिल्याने बलाबल ३४ मते मिळाली. लातूर महानगरपालिकेत गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसची एकहाती सत्ता होती़ पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ७० पैकी सर्वाधिक ३६ जागांवर भाजपाने विजय मिळविला़ तर सत्तेत असलेल्या काँग्रेसला ३३ व राष्ट्रवादी काँग्रेस एका जागेवर विजयी झाली़ बहुमतात आलेल्या भाजपाचा महापौर होणार हे निकालाच्या दिवशीच निश्चित झाले होते़ मात्र कोणाची वर्णी लागणार याबाबात भाजपात अखेरपर्यंत गुप्तता पाळण्यात आली़ उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजपाकडून महापौर व उपमहापौरपदासाठी प्रत्येकी चार अर्ज दाखल करण्यात आले होते. सोमवारी निवड प्रक्रिया सुरू होण्याअगोदर भाजपाचे सर्व नगरसेवक एकाच वेळी सभागृहात आले़ सकाळी १० वाजता महापौरपदाची निवड प्रक्रिया सुरू झाली़ उमेदवारी अर्ज माघार घेण्यासाठी ५ मिनिटांचा वेळ देण्यात आला होता़ यावेळी भाजपाकडून अॅड़ शैलेश गोजमगुंडे, शोभा पाटील, देविदास काळे यांनी माघार घेतली़ त्यामुळे भाजपाचे सुरेश पवार विरूध्द काँग्रेसचे विक्रांत गोजमगुंडे यांच्यात निवडणूक झाली़ यावेळी सुरेश पवार यांना ३६ तर विक्रांत गोजमगुंडे यांना ३४ मते मिळाली़ त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी जी़ श्रीकांत यांनी भाजपाचे सुरेश पवार यांना विजयी घोषित केले़ त्यानंतर उपमहापौर पदासाठी निवड प्रक्रिया सुरू झाल्यानंतर भाजपाकडून तिघांनी माघार घेतली. एकमेव देविदास काळे यांचा अर्ज भाजपाकडून राहिल्याने काँग्रेसचे युनूस मोमीन यांच्यात लढत झाली़ त्यात काळे यांना ३६ व मोमीन यांना ३४ मते मिळाली़ भाजपाने पहिल्यांदाच मनपात सत्ता स्थापन केल्याने कार्यकर्त्यांनी मनपाच्या आवारात फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष केला़
महापौरपदी सुरेश पवार, उपमहापौर देविदास काळे
By admin | Updated: May 22, 2017 23:45 IST