लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महापौर, उपमहापौरपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या (ता. २५) शेवटचा दिवस आहे. शिवसेनेतर्फे नंदकुमार घोडेले युतीचे उमेदवार म्हणून महापौरपदासाठी अर्ज भरणार आहेत. उपमहापौरपदासाठी भाजपच्या स्थानिक कोअर कमिटीमध्ये एकमत न झाल्याने उमेदवारी निश्चित करण्याचा चेंडू श्रेष्ठींकडे सोपविण्यात आला आहे. उद्या भाजपतर्फे उपमहापौरपदासाठी अर्ज भरण्यात येईल. अर्ज भरेपर्यंत श्रेष्ठींचा निर्णय झाला तर एकच अर्ज भरण्यात येईल, अन्यथा दोन अर्ज भरण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.रविवार, २९ आॅक्टोबर रोजी महापौर, उपमहापौरपदासाठी निवडणूक घेण्यात येणार आहे. शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार म्हणून नंदकुमार घोडेले महापौरपदासाठी अर्ज भरणार आहेत. यावेळी दोन्ही पक्षांचे स्थानिक नेते उपस्थित राहणार आहेत. युतीकडे पूर्णपणे बहुमत असल्याने निवडणूक अधिक सुकर होणार आहे. उपमहापौरपदासाठी भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. अडीच वर्षांसाठी हे पद असल्याने अचानक इच्छुकांची संख्या पाचपेक्षा अधिक झाली आहे. त्यामुळे स्थानिक कोअर कमिटीची दोनदा बैठक झाली. या बैठकीत एका नावावर एकमत न झाल्याने कोअर कमिटीने सर्व नावे श्रेष्ठींकडे पाठवून दिली आहेत. बुधवारी सकाळी श्रेष्ठी यावर निर्णय घेणार आहेत, असे सांगण्यात येत आहे. बुधवारीही निर्णय न झाल्यास भाजपकडून दोन अर्ज भरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.महापालिकेतील विरोधी पक्ष म्हणून एमआयएमकडूनही महापौर आणि उपमहापौरपदासाठी अर्ज भरण्यात येणार आहे. एमआयएमने दोन्ही पदांचे अर्ज घेतले आहेत. काँग्रेसतर्फेही महापौर आणि उपमहापौरपदासाठी अर्ज घेण्यात आले आहेत. काँग्रेसने यापूर्वी कधीच एमआयएमच्या उमेदवाराला मतदान केलेले नाही. त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेसही आपले स्वतंत्र उमेदवार देणार असल्याचे बोलले जात आहे.
महापौर, उपमहापौरपदासाठी युतीचे उमेदवार आज अर्ज भरणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 01:09 IST