औरंगाबाद : गणित विषयाची अनेकांना गोडी लावून विद्यार्थी घडविणारे आणि याच विषयात राष्ट्रपती पुरस्कार मिळविणारे गणित तज्ज्ञ द्वा. र. जरीवाला (८४) यांचे सोमवारी सकाळी साडेसहा वाजता निधन झाले. गुजराती विद्यालयात त्यांनी तीस वर्षांपेक्षाही अधिक काळ मुख्याध्यापक म्हणून काम केले आहे. द्वा. र. या नावानेच ते परिचित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन बंधू, चार मुले, एक मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. औरंगाबाद शहरात तसेच मराठवाड्यात गणित विषयासंबंधी शालेय स्तरावर त्यांनी विविध उपक्रम राबविले. राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत विद्यार्थ्यांनी यश मिळवावे, यासाठी त्यांची आयुष्याच्या अखेरपर्यंत धडपड चालू होती. वर्षभरापूर्वी ते विविध उपक्रमांत सक्रिय होते. पुणे एसएससी बोर्डाचे सदस्य म्हणून त्यांनी सुमारे १५ वर्षे काम केले. आठवी, नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी गणिताची पुस्तके लिहिली. ‘गणित शिक्षण’ म्हणून मासिकही त्यांनी चालविले. त्यांनी गणित विषयाचे अधिवेशन घेण्याचा उपक्रम औरंगाबादेत चालू केला. १९८५ साली निवृत्त झाल्यानंतर त्यांनी औरंगाबाद शहरातील विद्यार्थी राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत कसे यशस्वी होतील, यासाठी प्रयत्न केले. प्रज्ञाशोध परीक्षेसाठी ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत. गणित विषयात त्यांनी मार्गदर्शन केलेले अनेक विद्यार्थी आज उच्चपदावर काम करीत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन १९७९ साली त्यांना राष्ट्रपती डॉ. नीलम संजीव रेड्डी यांच्या हस्ते राष्ट्रपती पुरस्कार देण्यात आला. स्पर्धा परीक्षेसाठीही त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी म्हणूनही त्यांनी काम केले. १९७७-७८ साली शिक्षकांच्या वेतनासंबंधी चालू असलेल्या आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला होता. त्यावेळी त्यांना अटकही झाली होती. दत्ताजी भाले रक्तपेढीशीही त्यांचा संबंध होता. रक्तदान शिबिरासाठी निधी जमा करण्याच्या कामात ते मदत करीत. सायंकाळी साडेपाच वाजता पुष्पनगरी स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. लोकमतच्या वतीने वरिष्ठ उपाध्यक्ष ओमप्रकाश केला यांनी श्रद्धांजली वाहिली. ‘लोकमत’ एसएससी मार्गदर्शिकादहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी लोकमतने पहिल्यांदा मालिका चालू केली. दहावीच्या विद्यार्थ्यांना अत्यंत उपयुक्त अशा या मालिकेत द्वा. र. जरीवाला यांची महत्त्वाची भूमिका होती. या मालिकेचा हजारो विद्यार्थ्यांना फायदा झाला.
गणित तज्ज्ञ द्वा. र. जरीवाला यांचे निधन
By admin | Updated: May 17, 2016 00:36 IST