आखाडा बाळापूर : माहेराहून पैसे आणण्यास नकार दिल्याने होत असलेल्या जाचास कंटाळून २० वर्षीय विवाहितेने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना २४ आॅगस्ट रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास जरोडा येथे घडली. या प्रकरणी सासरच्या ११ जणांंविरुद्ध आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कळमनुरी तालुक्यातील जरोडा येथील रंगराव आश्राजी अंभोरे यांची मुलगी शितल हिचा विवाह मागील वर्षी कळमकोंडा येथील मारोती बाजीराव ढेंगळे याच्याशी झाला आहे. लग्नानंतर सहा महिन्याने ती पतीसोबत कामकाजानिमित्त औरंगाबाद येथे रांजणगाव परिसरात किरायाने घर घेवून राहत होती. मागील चार महिन्यापासून सासरची मंडळी घर व गॅस घेण्यासाठी माहेराहून पैसे आण म्हणून तिला तगादा लावत होते. पैशासाठी तिला चटकेही देण्यात आल्याचे याबाबत शितल ढेंगळे हिने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यावरून आरोपी मारोती ढेंगळे (पती), बाजीराव ढेंगळे (सासरा), सासू, सिमा, रुपाली, मिना, गजू, ज्ञानू, कदम (सर्व रा. कळमकोंडा), सोनी शिंदे, बापुराव शिंदे (रा.शिरडशहापूर ह.मु. रांजणगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.(वार्ताहर)