कुरूंदा : घरगुती कारणावरून अंगावर रॉकेल ओतून पेटवून देण्यात आलेल्या डोणवाडा येथील २५ वर्षीय विवाहितेचा गुरूवारी मध्यरात्री उपचारादरम्यान नांदेडच्या दवाखान्यात मृत्यू झाला. तिच्या मृत्यूपुर्व जवाबावरून यापूर्वी दाखल झालेल्या गुन्ह्यात खुनाचे कलम वाढवून कुरूंदा पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. वसमत तालुक्यातील डोणवाडा येथे ३ मे रोजी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास अश्विनी गणेश ढाकरे (वय २५) या विवाहितेच्या अंगावर रॉकेल टाकून जीवे मारण्याच्या उद्देशाने सासरच्या मंडळींनी तिला पेटवून दिले. या घटनेमध्ये ६३ टक्के जळाल्याने तिला सुरूवातीला वसमत येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर तिला पुढील उपचाराकरिता नांदेड येथे एका खासगी रूग्णालयात नेण्यात आले. त्याठिकाणी उपचार सुरू असताना २९ मे रोजी मध्यरात्री एकच्या सुमारास सदरील विवाहितेचा मृत्यू झाला. या प्रकरणात मृत्युपुर्व जवाबावरून आधीच दाखल असलेल्या गुन्ह्यात कलम ३०२ वाढविण्यात आले आहे. यातील आरोपी गणेश संभाजी ढाकरे (नवरा), संभाजी ढाकरे (सासरा), गयाबाई संभाजी ढाकरे (सासू, सर्व रा.डोणवाडा) यांना अटक करण्यात आली आहे. अधिक तपास फौजदार युद्धोधन जोंधळे करीत आहेत. (वार्ताहर)
विवाहितेला जाळून मारले; पतीसह तिघांना अटक
By admin | Updated: May 31, 2014 00:30 IST