बीड : माहेरहून पैसे आणत नाही म्हणून एका विवाहितेचा गळा दाबून खून केल्याची घटना मंगळवारी सकाळी पिंपरगव्हाण (ता. बीड) येथे घडली. आरोपी फरार असून या घटनेने खळबळ उडाली आहे.छाया गोरख आगाम (२२) असे मयत विवाहितेचे नाव आहे. तळेगाव हे तिचे माहेर असून दोन वर्षांपूर्वी तिचा विवाह गोरख आगाम (रा. पिंपरगव्हाण) याच्याशी झाला होता. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून छाया हिचा सासरच्यांकडून पैशासाठी छळ सुरु होता. मंगळवारी सकाळी राहत्या घरात तिचा मृतदेह आढळून आला. गावकऱ्यांनी कळविल्यानंतर ग्रामीण ठाण्याचे निरीक्षक अनंत जगताप घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करुन तिचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविला. यावेळी सासरकडील मंडळी तेथे नव्हती. त्यामुळे घातपात असावा असा संशय पोलिसांना आला होता. शवविच्छेद न अहवालात तिचा गळा दाबून खून केल्याचे स्पष्ट झाले. पिंपरगव्हाण येथे तिच्यावर पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार पार पडले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु होती. (प्रतिनिधी)
विवाहितेचा खून
By admin | Updated: April 4, 2017 23:16 IST