हिंगोली : सहकार क्षेत्रातील निवडणुकांना मुदतवाढ मिळाल्यामुळे या निवडणुका आता विधानसभेनंतर होणार असून हिंगोली जिल्ह्यातील पाच बाजार समित्यांच्या निवडणुका लागणार आहेत. सेवा सोसायट्यांसह एकूण १७३ संस्थांच्या निवडणुका होणार आहेत.हिंगोली जिल्ह्यात काही बाजार समित्यांत वाद सुरू आहेत. तर काही प्रशासक व इतर कारणांनी गाजत आहेत. मोजक्याच ठिकठाक आहेत. मुदत संपून निवडणुका लागण्याचा काळ आला आहे. मात्र ११ आॅक्टोबरपर्यंत सहकारातील निवडणुकांना मुदतवाढ देण्याची राज्य शासनाने अधिसूचना प्रसिद्ध केल्यामुळे निवडणुका लांबल्या आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर मात्र त्या घेता येणार आहेत. राज्य सहकार निवडणूक प्राधिकरण आल्यामुळे आता सहकार खात्याच्या निवडणुका वेळेत व चांगल्या पद्धतीने घेण्यावर भर दिला जात आहे.हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव, कळमनुरी, सिरसम, जवळा बाजार व हिंगोली बाजार समितीची निवडणूक होणार आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात एकूण ४१३ सेवा सहकारी सोसायट्या असून त्यापैकी १0४ सोसायट्यांच्या निवडणुकांचा बार उडणार आहे.याशिवाय काही पतसंस्थांच्याही निवडणुका होणार आहेत. यात नागरी, ग्रामीण व कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या पतसंस्था आहेत. तसेच सुशिक्षित बेरोजगारांच्या सोसायट्यांचाही यात समावेश आहे.विविध प्रकारच्या जिल्ह्यात एकूण १000 संस्था आहेत. त्यापैकी वेगवेगळ्या टप्प्यांत १७३ संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे सहकार क्षेत्र ढवळून निघणार आहे. विधानसभेच्या अनुषंगाने अनेकजण आतापासूनच फिल्डींग लावत आहेत. त्यातच आगामी काळात उमेदवारीच्या मागणीसाठी विधानसभेलाही काहींना कामाला जुंपले जाण्याची शक्यता आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
विधानसभेनंतर बाजार समित्यांचा बिगूल
By admin | Updated: September 13, 2014 00:09 IST