मुकुंदवाडी पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार जालिंदर संपतराव तेरे (रा. पाचोड, ता. पैठण) यांची मुलगी कल्पनाचे कृष्णासोबत २०१३ साली लग्न झाले. त्यांना ६ वर्षे आणि साडेतीन वर्षांची दोन मुले आहेत. लग्नानंतर काही दिवसांनी तिचा पती कृष्णा आणि तिचे सासू, सासरे हे किरकोळ कारणावरून कल्पनासोबत भांडण करून तिला शिवीगाळ करून मारहाण करायचे. हा त्रास ती मुलांकडे पाहून सहन करायची. १० मे रोजी रात्री त्याने दारूच्या नशेत तिच्यासोबत भांडण केले होते. शेजाऱ्यांनी त्यांचे भांडण रात्री २ वाजता सोडविले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी ८:३० वाजता कृष्णाने कल्पनाच्या आईला फोन केला आणि तो शिव्या देऊ लागला. तिच्या वडिलांनी फोन घेताच त्याने कल्पनाकडे फोन दिला. तेव्हा ती रडत होती. नवऱ्याने दारू पिऊन तिला मारहाण केल्याचे तिने सांगितले. सासू-सासऱ्यांनी तिला शिवीगाळ करून मारहाण केल्याचे तिने सांगितले. तुम्ही औरंगाबादला लवकर या, असे ती म्हणाली. ती फोनवर बोलत असतांना अचानक तिचा जोरात ओरडण्याचा आवाज आला आणि फोन बंद झाला.
काही वेळाने कल्पनाने गळफास घेतल्याचे तिच्या शेजाऱ्यांनी फोन करून त्यांना कळविले. या प्रकरणी तरे यांनी मुकुंदवाडी ठाण्यात आरोपी कृष्णा, त्याचे वडील बाबासाहेब आणि आईविरुद्ध तक्रार नोंदविली. पोलिसांनी गुन्हा नोंदविला. पोलीस निरीक्षक शरद इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घायाळ तपास करीत आहेत.
===========(===
आरोपीला दारूचे व्यसन
कल्पनाचा पती फरशी बसविण्याचे काम करतो. त्याला दारूचे व्यसन आहे. तो दारूच्या नशेत नेहमी पत्नीला मारहाण करायचा. बऱ्याचदा तिचे सासू-सासरे तिला मारहाण करीत.