नांदेड: कंधार तालुक्यातील मौजे सावरगाव (निपाणी) येथे पतीने अंगावर रॉकेल टाकून पत्नीला पेटविल्याची घटना ३० जुलै रोजी घडली़ या घटनेतील जखमी विवाहितेवर नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु होते़ त्यातच ४ आॅगस्ट रोजी या महिलेचा मृत्यू झाला असून पोलिसांनी आता खुनाचा गुन्हा नोंदविला आहे़मीनाबाई संतोष सोनकांबळे या विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेवून पती संतोष सोनकांबळे हा नेहमी त्यांना मारहाण करीत होता़ त्यात ३० जुलै रोजी मीनाबाई यांनी घरात रेशन नाही असे म्हटल्यावर संतोषने त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली़ त्यानंतर घरातील रॉकेल त्यांच्या अंगावर ओतून पेटवून दिले़ या घटनेत मीनाबाई या ७४ टक्के भाजल्या गेल्या होत्या़ त्यानंतर पती संतोषने घटनास्थळावरुन पळ काढला़ मीनाबाई यांना अगोदर मुखेड येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते़ त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना नांदेडला हलविण्यात आले़ कंधार पोलिसांनी मीनाबाई यांच्या जबाबावरुन संतोष सोनकांबळे याच्याविरोधात गुन्हा नोंदविला होता़ रुग्णालयात उपचारादरम्यान, ४ आॅगस्ट रोजी मीनाबाई यांचा मृत्यू झाला़ (प्रतिनिधी)
सावरगाव येथे विवाहितेचा जाळून खून
By admin | Updated: August 7, 2014 01:30 IST