औरंगाबाद - गुलाबी शेंदुरी बोंडअळीचा प्रादुर्भाव कपाशीवर अधिक दिसून येत आहे. त्याचे व्यवस्थापन आत्ताच गरजेचे असून, कपाशीच्या झाडांचे श्रेडींग करुन त्याचे कंपोस्टींग करा. पराट्या साठवून ठेवू नका. बोंडअळीचा प्रादुर्भाव असेल तर पालवी फुटत असली तरी फरदड घेण्यापेक्षा रब्बीत पेरणी करुन दुसरे पीक घ्या, असा सल्ला कृषी सहसंचालक डाॅ. दिनकर जाधव यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.
जिल्हा कृषी अधीक्षक तुकाराम मोटे, जिल्हा कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार यांच्यासह तालुका कृषी अधिकारी गावोगावी जाऊन यासंबंधी मार्गदर्शन करत आहे. शुक्रवारी पैठण तालुक्यात सालवडगांव येथे जिल्हा परिषद व कृषी विभागाचे संयुक्त मार्गदर्शन शिबिर पार पडले. एकात्मिक कीड व्यवस्थापनासंबंधी गंजेवार यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, शेतकऱ्यांनी पराट्या साठवून ठेवू नये. शेंदुरी बोंडआळी नियंत्रणासाठीच्या उपाययोजनांची आत्ताच गरज आहे. सरकीवर कोषावस्था वाढून पुढच्या वर्षी त्याचा जास्त प्रादुर्भाव दिसेल. बोंडआळीला पुढच्या वर्षी थोपवण्यासाठी सध्याचा कापूस काढून टाका, ज्यांची कपाशीचे फुले पाते चांगले आहेत. त्यांनी निंबोळी अर्क व किटकनाशकाची फवारणी करावी. प्रादुर्भाव असलेल्या कपाशीचे झाड बारीक तुकडे करुन त्याचे कंपोस्टींग करावे. पराट्या साठवून ठेवू नये. त्यात सरकीवर कोषावस्था वाढून पुढच्या वर्षी त्याचा प्रादुर्भाव दिसेल. तसेच वेचणी करुन फरदड घेऊ नये. त्यापेक्षा दुसरे पीक घेतल्यास जास्त फायदेशीर शेतकऱ्यांना ठरेल, असा सल्ला गंजेवार यांनी दिला आहे.