औरंगाबाद : टाऊन हॉल भागातील नूर कॉलनी या वसाहतीत मागील एक महिन्यात तीन निष्पाप नागरिकांचा डेंग्यूने बळी गेला. एकानंतर एक असे मृत्युसत्र सुरू असतानाही मनपाने कोणतीही दखल घेतली नाही. शनिवारी एका २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर कुंभकर्णी मनपा प्रशासन जागे झाले. रविवारी सकाळीच आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी या भागाची पाहणी केली. त्यानंतर आरोग्य विभागाने दिवसभर ठाण मांडून नागरिकांची आरोग्य तपासणी केली.डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नूर कॉलनीतील एका दहा वर्षीय मुलाचा डेंग्यूने मृत्यू झाला. २१ डिसेंबर रोजी समिरोद्दीन फारुकी या १४ वर्षीय मुलाचा डेंग्यूने मृत्यू झाला. शनिवारी अब्दुल जावेद या तरुणाचा डेंग्यूने मृत्यू झाला. एकानंतर एक तीन मृत्यू होईपर्यंत मनपाची यंत्रणा निंद्रिस्तच होती. ‘लोकमत’ने यासंदर्भात सविस्तर माहिती दिल्यानंतर आयुक्त सुनील केंद्रेकर रविवारी सकाळीच नूर कॉलनीत दाखल झाले. त्यांनी या भागातील नाल्याची संपूर्ण पाहणी केली. नाल्याची युद्धपातळीवर साफसफाई सुरू करावी. आरोग्य विभागाने नागरिकांची आरोग्य तपासणी करावी, अशा सूचना दिल्या. यावेळी शहर अभियंता एस.डी. पानझडे, कार्यकारी अभियंता अफसर सिद्दीकी, प्रभारी उपअभियंता एम.एम. खान उपस्थित होते. यावेळी नागरिकांनी आयुक्तांकडे साफसफाईसंदर्भात तक्रारीही केल्या.दुपारी १२ वाजता आरोग्य विभागाने नूर कॉलनीत कॅम्प लावला. दिवसभरात ६९ नागरिकांची तपासणी करण्यात आली. तापाचे ९ रुग्ण आढळून आले. ३० जणांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले. ५११ घरांमध्ये अॅबेट टाकण्यात आले. ५९८ पाण्याचे ड्रम तपासण्यात आले. ३ ड्रममध्ये डासअळ्या आढळून आल्या. नूर कॉलनी भागात फॉगिंग, औषध फवारणीही करण्यात आली.
तीन बळी घेणाऱ्या मनपाला आली जाग
By admin | Updated: December 28, 2015 00:25 IST