हणमंत गायकवाड , लातूरशहरातील करवसुली समाधानकारक नाही. कराची वसुली झाली तर विकासाला चालना मिळते. त्यामुळे आपल्या कारकीर्दीत कर वसुलीवर भर देऊन मनपाला आर्थिक सक्षम करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे मत नूतन आयुक्त रविंद्र पांढरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. नगरसेवक, पदाधिकारी आणि जनतेने साथ दिली, तर झोकून देऊन काम करण्याची तयारी आहे. नूतन आयुक्त रविंद्र पांढरे यांनी शुक्रवारी लातूर मनपाचा पदभार घेतला. पदभारानंतर लागलीच त्यांनी विभागनिहाय बैठकांना प्रारंभही केला. पहिल्यांदा कर विभागाची बैठक घेऊन मनपाचा आर्थिक कोष जाणून घेतला. यावेळी ‘लोकमत’शी बोलताना ते म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बळकटीकरणासाठी शासनाचे अनुदान तर गरजेचे आहेच. परंतु, स्थानिक कर संकलित होणे महत्त्वाचे आहे. या कराचा मेन्टेनन्स फंड म्हणून उपयोग होतो. शिवाय, शहराचा विकासही साध्य करता येतो. त्यासाठी रिकव्हरी महत्त्वाची आहे. कर्जमुक्त शहर, अशी आपल्या कामाची पद्धत आहे. हीच पद्धत लातूर मनपातही अंगिकारली जाईल. लातूर शहराचा नावलौकिक आहे. या लौकिकाला साजेल अशीच साथ मला मिळेल, अशी अपेक्षा आहे. त्यासाठी जनतेने कर वसुलीसाठी सहकार्य करावे. प्रारंभीच्या पहिल्या बैठकीत कराची वसुली मोठ्या प्रमाणात थकल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे येत्या एक-दोन दिवसांत कर वसुलीसाठी योग्य नियोजन केले जाईल, असेही ते म्हणाले.
महापालिकेला कर वसुलीतून सक्षम करणार
By admin | Updated: September 3, 2016 00:29 IST