औरंगाबाद : जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. रविवारी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत एकूण ९७३ मतदारांपैकी ८३८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सायंकाळी ५ वाजता लगेच मतमोजणी झाली. या निवडणुकीत सहकार विकास पॅनलने दणदणीत बहुमत मिळविले. १३ संचालक मंडळ असलेल्या या पतसंस्थेवर विकास पॅनलचे ९ तर सहकार प्रगती पॅनलचे ४ उमेदवार निवडून आले. या निवडणुकीच्या प्रचाराचा मागील १५ दिवसांपासून धुराळा उडाला होता. या निवडणुकीत साडेतीन पॅनलच्या माध्यमातून ४९ उमेदवार आपले नशीब अजमावत होते. ही पतसंस्था ताब्यात घेण्यासाठी विविध पॅनलप्रमुख व उमेदवारांनी आश्वासनांची उधळण करीत शनिवारी जि. प. मुख्यालयात सभा व रॅली काढून प्रचाराची सांगता केली होती. रविवारी ही निवडणूक सुरळीत झाली. सायंकाळी मतमोजणी झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी यशवंत देवकर यांनी निकाल जाहीर केला. तेव्हा विजयी उमेदवारांनी जल्लोष साजरा केला. सहकार विकास पॅनलचे विजयी उमेदवार असे- प्रदीप राठोड, बाबासाहेब काळे, कल्याण भोसले, विजय काटे, दत्तात्रय वाणी, ज्ञानेश्वर सोनवणे, लक्ष्मीकांत बोरसे, सुनील खंडाळे आणि सुनीता दहीहंडे, तर सहकार प्रगती पॅनलचे संजय महाळंकर, गणेश काथार, पंडित जाधव आणि मनीषा कदम आदींचा समावेश आहे. यामध्ये सहकार विकास पॅनलमधील भटक्या विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील उमेदवार प्रदीप राठोड यांना बिनविरोध निवडून देण्याबाबत सर्वच पॅनलचे प्रमुख हे आपल्या निर्णयावर शेवटपर्यंत ठाम होते; पण अखेरच्या वेळी एक-दोन उमेदवारांनी विरोध केल्यामुळे राठोड यांना निवडणूक रिंगणात उतरावे लागले. अखेर राठोड यांनी या निवडणुकीत आपले वर्चस्व सिद्ध करून दाखविले.
विकास पॅनलने मिळविले बहुमत
By admin | Updated: January 11, 2016 00:06 IST