छत्रपती संभाजीनगर : छावणीतील इदगाह मैदानाजवळील जुनी इमारत जीर्ण झाल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने तीन वर्षांपूर्वी कार्यालय तेथून रेल्वे स्टेशन परिसरात स्थलांतरित केले. जिल्हा प्रशासनाने गतवर्षी मात्र याच धोकादायक इमारतीत जिल्हा जलसंधारण अधिकारी यांचे कार्यालय थाटून संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांचे जीव धोक्यात घातले.
पावसाळ्यात जुन्या जीर्ण झालेल्या इमारती पडू शकतात. अशा इमारतीत दबून जीवितहानी होण्याचा धोका असतो. यामुळे महापालिकेच्या वतीने अशा धोकादायक इमारत मालकांना नोटिसा बजावून इमारतीत कोणीही राहू नये, असे निर्देश देतात. तसेच जुने बांधकाम पाडून टाकण्याची सूचना दिली जाते. छावणी इदगाहजवळील इमारतीत ५० वर्षांपासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यालय होते. या कार्यालयाची इमारत धोकादायक असल्याचे स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये निदर्शनास आले होते. यामुळे मजीप्राने आपले कार्यालय रेल्वे स्टेशन परिसरात स्थलांतरित केले.
मागील तीन वर्षांपासून मजीप्राच्या मालकीची ही इमारत विनावापर बेवारस अवस्थेत पडून होती. याचदरम्यान दोन वर्षांपूर्वी गजाजन महाराज मंदिराजवळील जिल्हा मृद व जलसंधारण अधिकारी कार्यालयाची जागा सारथी संस्थेला देण्यात आली. या जागेवर सारथीचे कार्यालय आणि विद्यार्थी वसतिगृहाची इमारत बांधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ठेकेदाराच्या दबावामुळे जिल्हा जलसंधारण अधिकाऱ्यांना त्यांचे कार्यालय सोडण्याचे आदेश देण्यात आले हाेते. गतवर्षी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा जलसंधारण अधिकारी कार्यालयास शासकीय इमारतीत जागा देण्यासाठी शोधाशोध केली. शेवटी छावणी इदगाह मैदानाजवळील मजीप्राची वापरात नसलेली धोकादायक इमारत जलसंधारण विभागाला देण्यात आली.
इमारत ताब्यात मिळाल्यानंतर जलसंधारण अधिकाऱ्यांनी थोडीफार डागडुजी करून आपले कार्यालय तेथे सुरू केले. असे असले तरी ज्या इमारतीला धोकादायक म्हणून घोषित करण्यात आले; ती इमारत एखाद्या कार्यालयास देण्याचे धाडस जिल्हाधिकाऱ्यांनी का दाखवले, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होतो. ही इमारत पूर्णपणे खिळखिळी झाल्याचे दिसते. इमारतीचे प्लॅस्टर जागोजागी पडलेले असून, आतील लोखंडी गजही दिसतात.