माजलगाव : माजलगाव आठवडी बाजार हा शहरातील गजाननगर, शाहूनगर भागात भरत असल्याने त्या भागातील नागरिकांनी बाजार स्थलांतर करावा, या मागणीसाठी आंदोलने करून निवेदन दिले, न्यायालयातही धाव घेतली. न्यायालयातून बाजार स्थलांतराचा आदेश घेतला. आदेशाचे पालन करीत न.प.ने बाजाराचे स्थलांतर केले, परंतु असुविधा असलेल्या भागात हा बाजार भरविण्यात आला असल्याचा आरोप काही लोकांनी केला. बुधवारी पहाटेपासूनच पोलीस कर्मचारी, दंगल नियंत्रक पथक, नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी पहाटेपासूनच बाजारतळावर हजर राहून येणाऱ्या शेतकरी व व्यापाऱ्यांना बाजारतळावर बसण्यास मज्जाव करीत होते. मनूर रोडवरील जागेवर बाजार भरविण्यास त्यांना भाग पाडले. परंतु या रोडवरील बाजारतळावर शेतकऱ्यांनी जाण्यास नकार देऊन आपले घर जवळ करीत बाजारावर बहिष्कार टाकला. ग्राहकांनीही या बाजाराकडे पाठ फिरविली.माजलगाव आठवडी बाजार स्थलांतराचा वाद अनेक वर्षांपासून चालू आहे. न.प.कडून ज्या भागात बाजाराचे स्थलांतर करण्यात आले त्या भागात शेतकरी, व्यापारी, ग्राहक यांना कुठल्याही सोयी-सुविधा नसल्याने त्यांनी त्या जागेवर जाण्यास नकार दिला. न.प. कर्मचाऱ्यांनी पोलिसांना सोबत घेऊन मनूर रोडवरील बाजाराच्या ठिकाणी जाण्यास भाग पाडल्याने अनेक शेतकऱ्यांनी बाजारावरच बहिष्कार टाकला. शहरातील सांडपाणी ज्या नाल्यांमधून जाते त्या सर्व नाल्या या बाजारतळाच्या चारही बाजुने जात असल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. तसेच बाजाराच्या चारही बाजुने बेशरमांच्या झाडांचा विळखा आहे. विशेष म्हणजे गावापासून या बाजाराचे ठिकाण दूर असल्याने ग्राहक जाण्यास नकार देत आहेत. तसेच त्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही समोर केला जात आहे. महिला, लहान मुले, वृद्ध यांना अशा चिखलाच्या रस्त्यावरुन व असुविधा असलेल्या ठिकाणी बाजार आणण्यासाठी जात असतांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. माजलगाव शहरातील आठवडी बाजाराचा प्रश्न हा शहरासह परिसरातील १ लाख लोकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागणे आवश्यक आहे. शेतकरी, व्यापारी यांचे हाल होऊ नयेत, यासाठी त्यांना पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध करुन देणे आवश्यक आहेत. शेतकरी, व्यापारी, ग्राहक यांचे हाल होऊ नयेत, यासाठी हा बाजार माजलगाव महाविद्यालयाच्या बाजूच्या जागेवर भरवावा, अशी मागणी भाजपाचे भाई गंगाभिषण थावरे यांनी केली आहे.शहरातील आठवडी बाजाराबाबत निर्णय घेण्याचा अधिकार हा सर्वस्वी स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या नगर परिषदेला असून, त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे रितसर प्रस्ताव पाठवून जी जागा सोयीस्कर आहे त्यांची मागणी करुन योग्य ती प्रशासकीय कार्यवाही करणे गरजेचे आहे. शहरवासियांना आठवडी बाजारासाठी सोयीयुक्त जागा मिळण्यास माझा कसलाही विरोध नसल्याचे आ. प्रकाश सोळंके यांनी सांगितले.(वार्ताहर)
माजलगाव आठवडी बाजाराचा फज्जा !
By admin | Updated: August 14, 2014 01:57 IST