लोकमत न्यूज नेटवर्कश्रीक्षेत्र माहूर : शहरातील विविध रस्त्यावरील व हागणदारी परिसरासह सार्वजनिक ठिकाणांची केंद्रीय गुणनियंत्रण समितीतर्फे तृतीयपक्ष (थर्डपार्टी) निरीक्षणाअंती शहर १०० टक्के हागणदारीमुक्त झाल्याचा अहवाल केंद्रीय समितीने २४ जून रोजी शासनाकडे सादर केला आहे. समितीच्या अहवालाची प्रत प्राप्त होताच नगराध्यक्ष फिरोज दोसाणी, मुख्याधिकारी काकासाहेब डोइफोडे यांनी नगरसेवक व स्वच्छतादूत, पत्रकारांना याबाबतची माहिती दिली व फटाक्यांची आतषबाजी करुन जल्लोष साजरा केला. केंद्रीय समितीने शिफारस केल्याने शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी एक कोटी रुपयांच्या निधीसह पारितोषिकासाठी पालिका पात्र ठरल्याचे दोसाणी यांनी सांगितले. गुणनियंत्रण विभागाचे अधिकारी विश्वजित मुजूमदार यांच्या समितीने २३ जून रोजी शहरातील बुद्ध भूमी परिसर, मथुरानगर, ब्राह्मण गल्ली, शिवाजी चौक, सोनापीर दर्गाह, गणेशनगर, जगदंबा स्कूल, जि़प़ नवी आबादी स्कूल, मातृतीर्थ रोड या ९ ठिकाणांसह शहरातील विविध वस्त्यांमध्ये जावून वैयक्तिक शौचालयांसह सार्वजनिक शौचालयांची शिवाय नदी भागासह शहरातील गरीब वस्त्यांमध्ये पाहणी केली होती.शहर हागणदरीमुक्त झाले आहे. एक कोटींचे पारितोषिक पटकावण्यास पालिका सिद्ध झाली. प्रत्येक घरात वैयक्तिक शौचालय झाल्यास तो आदर्श निर्माण झाला. माहूर हे तीर्थक्षेत्राचे ठिकाण असून वर्षात ९ यात्रा येथे होत असतात व दररोज हजारो भाविक येथे येतात़ त्यामुळे शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी खूप कसरत करावी लागली. सीओ काकासाहेब डोईफोडे, अधीक्षक वैजनाथ स्वामी, उपनगराध्यक्ष राजकुमार भोपी, इलियास बावाणी, शीतल जाधव, अश्विनी तुपदाळे, रहमत अली, वनिताताई जोगदंड, रफीक सौदागर यांनी विशेष परिश्रम घेतले. तर स्वच्छतादूत आनंद तुपदाळे, गणेश जाधव यांनी विशेष सहकार्य केले. शहरवासियांनी ऩप़च्या आवाहनाला वेळोवेळी प्रतिसाद दिल्याने हे शक्य झाले असे दोसाणी यांनी सांगितले.
माहूर तालुका १०० टक्के हागणदारीमुक्त
By admin | Updated: June 24, 2017 23:48 IST