श्रीनगर : आपली मते व्यक्त करण्याचा अधिकार काढून घेण्यात आला असून, काश्मीर हे खुले जेल झाले आहे, असा आरोप पीडीपी नेत्या महेबूबा मुफ्ती यांनी केला आहे. त्यांना प्रशासनाने पत्रपरिषद घेण्यास मनाई केली आहे. मात्र, त्यांना नजरकैद केल्याचा पोलिसांनी इन्कार केला आहे.
जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री असलेल्या महेबूबा यांना शुक्रवारी त्यांच्या पक्षाचे नेते वाहीद पारा यांच्या निवासस्थानी भेट देण्यास मनाई करण्यात आली. त्यांना एनआयएने या आठवड्याच्या प्रारंभी अटक केली होती. त्यानंतर महेबूबा यांनी दुपारी ३ वाजता पत्रपरिषद बोलावली होती. तथापि, पोलिसांनी पत्रकारांना महेबूबा यांच्या घरापासून १०० मीटरवर अडविले व वरून आलेल्या आदेशानुसार त्यांना पत्रपरिषद घेता येणार नाही, असे सांगितले.
याबाबत मुफ्ती यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, माझ्या घरात प्रवेश करण्यापासून पत्रकारांना रोखण्यात आले. याबाबत काहीही लेखी आदेश नाहीत. काश्मीर हे खुले जेल झाले आहे. येथे तुम्ही तुमची मते व्यक्त करू शकत नाहीत.
दरम्यान, पोलिसांनी म्हटले आहे की, मुफ्ती यांना नजरकैद करण्यात आलेले नाही. त्यांना सुरक्षेच्या कारणास्तव पुलवामा दौरा पुढे ढकलण्यास सांगण्यात आले आहे.
महेबूबा यांच्या कन्या इल्तिजा यांनी एक व्हिडिओ शेअर करून म्हटले आहे की, मला पोलीस हा परिसर सोडून जाऊ देत नाहीत. मी याबाबत गेटबाहेरील पोलिसांना कारण विचारले असता, त्यांनी दुसऱ्या गेटकडे जाण्यास सांगितले. तेथे पोलीस अधीक्षक साहेब व जिल्हाधिकारी आहेत, असे त्यांचे म्हणणे होते.
पारा यांच्या कुटुंबियांना भेटायला जाण्याची त्यांची इच्छा होती. त्यांना पोलिसांनी परवानगी दिली नाही. पारा यांना निराधार आरोपांच्या आधारावर अटक करण्यात आली आहे, असा त्यांचा आरोप आहे.
मला पुन्हा एकदा दोन दिवसांपासून बेकायदेशीररीत्या घरात कैद करण्यात आली आहे. मला पुलवामात जाऊ देत नाहीत. भाजपचे मंत्री व त्यांचे समर्थक काश्मीरच्या कानाकोपऱ्यात फिरत आहेत; परंतु माझ्याच सुरक्षेची समस्या निर्माण झाली आहे. माझ्या मुलीलाही घरात कैद केले आहे, असे त्यांनी म्हटले आहे.