जालना : वीज ग्राहकांना रिडींग न घेता दिल्या जाणाऱ्या व विलंबाच्या देयकांना संबंधित एजन्सीच जबाबदार असून या एजन्सीविरुद्ध दंडाची कारवाई करण्याच्या हालचाली महावितरणच्या जिल्हा कार्यालयाने सुरू केल्या आहेत. दरम्यान, तत्पूर्वी संबंधित एजन्सीच्या संचालकांची तातडीने बैठक बोलाविण्याचे आदेश अधीक्षक अभियंत्यांनी सोमवारी दिले.‘लोकमत’ च्या हॅलो जालनाच्या १० व ११ आॅगस्टच्या अंकातून शहरात वीज ग्राहकांना दिली जाणारी अव्वाची सव्वा बिले आणि विविध भागांमध्ये केलेली नियमबाह्य वीज जोडणी याबाबतचे वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. या वृत्तामुळे सोमवारी वीज वितरण कंपनीच्या येथील पॉवर हाऊसमधील कार्यालयात सकाळी १० वाजेपासूनच वेगवेगळ्या भागातून अनेक ग्राहक आपल्या समस्या घेऊन आले होते. महिनोमहिने अंदाजे युनिट टाकून नंतर एकाचवेळी अधिक युनिटचे बिल देऊन मानसिक त्रास झाल्याचा सूर ग्राहकांमधून निघाला. त्यामुळे ग्राहकांकडून विलंबाच्या वीज देयकापोटी आकारण्यात येणाऱ्या व्याजाची रक्कमही संबंधित एजन्सीकडून वसूल करावी, अशी मागणीही काही ग्राहकांनी केली. काही ग्राहकांना १२ महिने, १५ महिने तर काहींना चक्क दोन वर्षांपर्यंतची देयके अंदाजे युनिटनेच आलेली आहेत. एक-दोन महिने वीज देयकाच्या रक्कमेचा भरणा केला नाही तर महावितरण संबंधित ग्राहकांकडील वीजपुरवठा खंडित करते. मग अंदाजे युनिटची देयके देऊन ग्राहकांचीच अडवणूक का केली जाते, असा संतप्त सवालही यावेळी ग्राहकांनी केला. याबाबत महावितरणचे अधीक्षक अभियंता पानढवळे पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, शहरात मीटर रिडिंगची नोंद घेण्यासाठी एजन्सी कार्यरत असून ग्राहकांना अंदाजित बिले देण्याबाबत संबंधित एजन्सीला जाब विचारण्यात येईल. चुकीची देयके दिली असल्यास वेळप्रसंगी एजन्सीवर दंडाची कारवाई करण्याचा इशाराही अधीक्षक अभियंता पानढवळे यांनी दिला. दरम्यान, याबाबत संबंधित एजन्सीची तातडीने बैठक बोलाविण्याचे आदेश पानढवळे यांनी उपकार्यकारी अभियंता कुलकर्णी यांना दिले. (प्रतिनिधी)
महावितरणने केले हात वर..!
By admin | Updated: August 12, 2014 01:57 IST