लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने परभणी शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात जिल्ह्यातील हजारो उपासक-उपासिकांच्या उपस्थितीत महावंदनेचा कार्यक्रम पार पडला.महावंदना सुकाणू समिती आणि भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने तीन वर्षांपासून महावंदनेचा उपक्रम राबविला जात आहे. शनिवारी धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ हा कार्यक्रम घेण्यात आला. सकाळी ८ वाजता धम्मवंदनेच्या कार्यक्रमास प्रारंभ झाला. मुळावा येथील भंते प्राचार्य डॉ.खेमधम्मो महास्थवीर यांनी उपस्थितांना त्रिशरण, पंचशील आणि धम्मदेसना दिली. यावेळी भंते पी. धम्मानंद, भंते प्रज्ञा बोधी यांच्यासह भिख्खू संघाची मंचावर उपस्थिती होती. जिल्हाधिकारी पी.शिव शंकर, आयुक्त राहुल रेखावार, पोलीस अधीक्षक दिलीप झळके, सीईओ प्रताप सवडे यांचीही उपस्थिती होती. धम्मदेसनेमध्ये प्राचार्य डॉ.खेमधम्मो म्हणाले, जाती-पातीच्या भिंती तोडून विश्व मांगल्याची कामना करणे आवश्यक आहे.जगाला युद्धाची नव्हे तर बुद्धाची गरज असल्याचे ते म्हणाले. धम्मदेसनेनंतर १४ आॅक्टोबर १९५६ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञांचे वाचन करण्यात आले. त्यानंतर मुंबई येथे झालेल्या दुर्घटेनतील मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमात समता सैनिक दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली.
हजारोंच्या साक्षीने महावंदना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 00:45 IST