औरंगाबाद : मराठा सेवा संघास २०१५ मध्ये २५ वर्षे पूर्ण होत आहेत. या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त राज्यस्तरीय विशेष महाअधिवेशन ८ जून रोजी येथील संत तुकाराम महाराज नाट्यगृहात (सिडको एन-५) होणार आहे. ही माहिती मराठा सेवा संघ महाराष्ट्रचे प्रवक्ते व विंग कमांडर टी. आर. जाधव यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. जाधव म्हणाले, महाअधिवेशनाचे उद्घाटन शिवराज जाधव (कैकाडी) महाराज यांच्या हस्ते होणार आहे. ‘मराठा सेवा संघाचा २५ वर्षांचा लेखाजोखा’ या विषयावर चर्चा होईल. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ‘लोकमत’चे कार्यकारी संपादक चक्रधर दळवी, तर स्वागताध्यक्ष संभाजी जाधव उपस्थित राहणार आहेत. या सत्राचे अध्यक्ष कामाजी पवार असतील, तर प्रदीप सोळंके, मनोज आखरे, चंद्रकांत बनसोडे यांचा सहभाग असेल. पहिल्या सत्रात दुपारी १२ ते २ या वेळेत महिला (जिजाऊ ब्रिगेड) सत्रात ‘स्त्रीमुक्ती चळवळीतील मराठा सेवा संघाचे योगदान’ या विषयावर चर्चा होईल. या सत्राचे अध्यक्षस्थान अॅड. वैशाली डोळस भूषवतील. या विषयाची भूमिका अनुराधा ठोंबरे मांडतील, तर डॉ. प्रतिभा पाटील, प्रा. स्मिता पानसरे, अॅड. जयश्री अकोलकर यांचा सहभाग असेल. दुसर्या सत्रात दुपारी दोन ते साडेतीनदरम्यान ‘सामाजिक चळवळीत मराठा सेवा संघाचा लेखाजोखा’ या विषयावरील चर्चेत डॉ. झेड. ए. पठाण व डॉ. सुदाम चिंचाणे भाग घेतील. या सत्राचे अध्यक्ष राहुल पोकळे असून, प्रास्ताविक प्रा. भाऊसाहेब शिंदे करणार आहेत. समारोपाच्या सत्रात ‘मराठा सेवा संघाला आत्मपरीक्षणाची गरज का आहे’ या विषयावर चर्चा होईल. त्याचे अध्यक्ष अॅड. पुरुषोत्तम खेडेकर भूषवतील, असे टी. आर. जाधव म्हणाले. अधिवेशनाची सदस्य नोंदणी ८ जून रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी सातपर्यंत केली जाईल. यावेळी चंद्रकांत बनसोडे, विजय सोमवंशी, संजीव साठे पाटील, संभाजी जाधव, प्रा. आर. एस. पवार, अनुराधा ठोंबरे आदी उपस्थित होते.
मराठा सेवा संघाचे ८ जूनला महाअधिवेशन
By admin | Updated: May 26, 2014 01:15 IST