महापौर, उपमहापौर पदांच्या निवडीनंतर स्वीकृत सदस्यांसाठी पक्षाकडून उमेदवारी अर्ज घेण्यात आले. त्यानंतर या स्वीकृत सदस्यांची निवड जाहीर केली.भारतीय जनता पार्टी व काँग्रेस पक्षाच्या विजयी उमेदवारांच्या संख्येवरून ७० सदस्य असलेल्या मनपात भाजपाच्या वाट्याला ३ स्वीकृत सदस्य आले आहेत, तर काँग्रेस पक्षाला २ स्वीकृत सदस्यत्व मिळाले आहे. भाजपाने गुरूनाथ मगे, प्रकाश पाठक, अनंतकुमार गायकवाड यांना स्वीकृत सदस्य म्हणून मनपात पाठविले आहे. तर काँग्रेस पक्षाने माजी महापौर चाँदपाशा घावटी व युवक काँग्रेसचे पदाधिकारी पुनीत पाटील यांना स्वीकृत सदस्यपदी संधी दिली आहे. दोन्ही पक्षांनी दिलेल्या या उमेदवारांची निवडणूक निर्णय अधिकारी जी. श्रीकांत यांनी स्वीकृत सदस्याची घोषणा केली. महापौर व उपमहापौर पदांच्या निवडीनंतर सत्ताधारी पक्षाच्या सभागृह नेत्याच्या निवडीचा वाद झाला होता. पक्षाकडून सभागृह नेत्याचे नाव येईपर्यंत गटनेत्याला सभागृह नेता राहील, असे जाहीर झाल्यानंतर हा वाद निवळला. त्यानंतर अॅड. दीपक सूळ यांची विरोधी पक्ष नेतेपदी निवड करण्यात आली. ते म्हणाले, चुकीचे काय होत असेल, तर त्याला विरोध. विकास होत असेल तर त्याच्याशी सोबत. आणि काँग्रेस नेतृत्वाने निवडणूक काळात दिलेला विकासाचा अजेंडा राबविण्यासाठी विरोधी पक्ष नेतेपद खर्ची घालू.
मगे, पाठक, गायकवाड भाजपाचे स्वीकृत सदस्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2017 23:45 IST