परतूर : परभणी जिल्ह्यातील काही गावांना पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत असल्याने परभणी जिल्हाधिकाऱ्यांनी पूर्णा शहरासाठी पाणी सोडण्यास पाठपुरावा केला. अखेर रविवारी निम्न दुधना प्रकल्पातून १२ क्युसेस वेगाने पाणी सोडण्यात आले आहे.याबाबत पाणी सोडण्यासाठी निम्न दुधना प्रकल्पाचे पाणी पूर्णेच्या दिशेने झेपावले असून, हे पाणी पिण्यासाठी सोडण्यात आल्याचे ंसांगण्यात येते. निम्न दुधना प्रकल्पात यावर्षी चांगला पाणीसाठा आहे. मागील आठवड्यात परभणीसाठी पाणी सोडण्यात आले होते.आता पूर्णा शहराला पिण्यासाठी हे पाणी सोडण्यात येत आहे. रविवारी सकाळी ९ वाजेपासून या पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणाचे चार दरवाजे उघडण्यात आले आहेत. यातून १२ क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हा विसर्ग तीन दिवस सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. धरणात सध्या ७३. ४७ टक्के जीवंत पाणीसाठा आहे.सदरील पाणी परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये सोडण्यात आले असून, दुधना काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, पूर्णेला पाणी सोडल्याने परभणीलाही पाणी मिळत आहे. (वार्ताहर)
निम्न दुधनाचे पाणी पूर्णेच्या दिशेने झेपावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2017 23:39 IST