औरंगाबाद : लॉर्ड मेकॉले मुक्तीचा महामार्ग म्हणजे नवीन शैक्षणिक धोरण होय, असे प्रतिपादन भाजपचे खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी केले.
विनता य गर्दे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ते ‘नवे शैक्षणिक धोरण, संधी आणि आव्हाने’ या विषयावर ऑनलाईन व्याख्यान देत होते. सरस्वती भुवन माजी विद्यार्थी संघटना आणि सभु शिक्षण संस्थेच्या ‘ऋणानुबंध’तर्फे हे विशेष व्याख्यान आयोजिले होते.
डॉ. सहस्त्रबुद्धे यांनी सांगितले की, कोठारी आयोग ते राममूर्ती आयोगापर्यंत आयोगामागून आयोग नेमण्यात आले; पण त्यांचे चिंतन कधी प्रत्यक्षात आले नाही. जून २०२० ला विद्यमान केंद्र सरकारने हे नवीन शैक्षिणक धोरण जाहीर केले आणि लॉर्ड मेकॉले मुक्तीचा महामार्ग मोकळा झाला. स्वदेश, स्वभाषा, स्वधर्म याची योग्य जाणीव करून देणारे हे धोरण आहे.
फ्रेंच, जर्मन व चिनी भाषेत इंजिनिअरिंग शिकता येऊ शकते, तर मग मराठी, बंगाली वा तमिळ भाषेत का नाही, याचा विचार या नव्या धोरणात करण्यात आला आहे. हे धोरण विद्यार्थी केंद्रबिंदू मानून शिक्षकाधिष्ठित बनविण्यात आले आहे. यात नियमित मूल्यांकनाला महत्त्व देण्यात आले आहे. पुस्तकी शिक्षणापेक्षा प्रात्यक्षिकावर भर देण्यात आला आहे.
नव्या शैक्षणिक धोरणात शालेय संकुलाची संकल्पना मांडली गेली आहे. बंधन केंद्रित व्यवस्थेला छेद देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. संसाधनांचा विवेकपूर्ण उपयोग करून घेतला पाहिजे, हे नवीन धोरण सांगते. संस्था बांधणी हे शास्त्र आहे. तंत्रज्ञान व दिव्यांगस्नेहता यांचा आग्रह या धोरणात धरण्यात आला आहे.
यावेळी प्रश्नोत्तरेही झाली. रूपाली पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रसाद कोकीळ यांनी सहस्त्रबुद्धे यांचा परिचय करून दिला. प्रमोद माने यांनी आभार मानले.