येरमाळा : जुनी बैलजोडी विकून नवीन बैलजोडी घेण्यासाठी निघालेल्या शेतकऱ्याच्या खिशातील ५३ हजार रूपये चोरट्यांनी लंपास केले़ ही घटना रविवारी सकाळी घडली़सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, येरमाळा येथील रणजित मुकुंद बारकुल या शेतकऱ्याने जुनी बैलजोडी विकली होती़ नवीन बैलजोडी विकत घेण्यासाठी बैलजोडी व सोयाबीन विकून मिळालेले असे एकूण ५३ हजार रूपये घेवून ते येरमाळा बसस्थानकात आले होते़ तेथून ते अक्कलकोट-जालना बसमधून नेकनूर येथे बैलजोडी खरेदी करण्यासाठी जात होते़ मात्र, येरमाळा बसस्थानकात ते आले असता चोरट्यांनी त्यांचा खिसा कापून ५३ हजार रूपये लंपास केले़ ही घटना येईपर्यंत चोरट्यांनी तेथून पळ काढला होता़ घटनेनंतर रणजित बारकुल यांनी येरमाळा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे़ या घटनेने येरमाळासह परिसरात खळबळ उडाली आहे़येरमाळा येथील बसस्थानकात मंगळवार, शुक्रवारसह पौर्णिमेला मोठी गर्दी असते़ शिवाय इतर दिवशीही या बसस्थानकात गर्दी असते़ मागील काही महिन्यांपासून या गर्दीत प्रवाशांचे खिसे, साहित्य पळविण्याचा सपाटा चोरट्यांनी लावला आहे़ मात्र, अनेकांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिलेली नाही़काबाड कष्ट करून जोपासलेली बैले, विकलेले सोयाबीन आणि नवीन बैलजोड घेण्यासाठी निघालेल्या शेतकऱ्याचे दहा-वीस नव्हे तर तब्बल ५३ हजार रूपये चोरट्यांनी हातोहात पळविले आहेत़ ही घटना घडल्यानंतर शेतकऱ्याने ठाण्यात तक्रार अर्जही दिला आहे़ मात्र, येरमाळा पोलिसांच्या उदासिनतेमुळे रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता़
स्थानकात शेतकऱ्याला लुटले
By admin | Updated: November 16, 2014 23:38 IST