केळगाव : सिल्लोड तालुक्यातील पिंपळगाव घाट येथील रोहित्र जळाल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे मागील आठ दिवसांपासून गाव अंधारात होते. त्यात रबी पिकांना पाणी देणे सुरू असून वीजपुरवठा खंडित झाल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यामध्ये नाराजी निर्माण झाली आहे. महावितरणकडे तक्रार करूनदेखील दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र समोर आले. यावर ‘लोकमत’ने ३० नोव्हेंबरला पिंपळगाव घाट अंधारात या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करताच महावितरण विभाग झोपेतून जागे झाले. चार दिवसांच्या आत पिंपळगाव घाट येथे नवीन रोहित्र बसविण्यात आले.
गेल्या आठ दिवसांपासून पिंपळगाव घाट येथील वीजपुरवठा खंडित झाला होता. गावकरी व शेतकरी बांधवांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असे. गाव अंधारात असताना महावितरण विभाग गाढ झोपेत कसे राहू शकत, असा प्रश्न गावकऱ्यांकडून केला जात होता. गावातील काही नागरिकांनी महावितरणकडे रीतसर तक्रारदेखील दिली. मात्र, वायरमनच्या आडमुठेपणामुळे येथील कामे रखडली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ‘लोकमत’च्या वतीने या सर्व प्रकार उघडकीस आणल्यानंतर महावितरणचे अधिकारी व कर्मचारी कुंभकर्णी झोपेतून बाहेर पडले. अखेर चार दिवसांत शुक्रवारी या गावातील वीजपुरवठा सुरळीत झाला आहे.
फोटो - रोहित्र बसविताना महावितरणचा कर्मचारी.