औरंगाबाद : शहर व ग्रामीण परिसरासाठी दोन वेगळी तहसील कार्यालये सुरू करण्याला पुढच्या वर्षी मुहूर्त लागणार असून, त्या कार्यालयातील अप्पर तहसीलदार या पदावर नियुक्ती मिळण्यासाठी मोठ्या प्रमाणात लॉबिंग सुरू झाले आहे. शहराच्या तिन्ही मतदारसंघांचा कारभार त्या कार्यालयातून चालणार असल्यामुळे त्या पदासाठी इच्छुक असलेल्या स्थानिक व काही बाहेरच्या अधिकाऱ्यांनी महसूल खात्यात तळ ठोकल्याचे वृत्त आहे. अधिवेशन संपल्यानंतर नवीन तहसीलच्या उद्घाटनाचा मुहूर्त ठरणार असून, २६ जानेवारीपर्यंत नवीन तहसीलचे कामकाज सुरू होईल. रजिस्ट्री कार्यालयाशेजारील मत्स्य विभागाची इमारत नवीन तहसीलसाठी सज्ज झाली आहे; परंतु महसूल मंत्रालयातून विभाजन करण्याचा अधिकृत अध्यादेश आलेला नाही. अध्यादेश न आल्याने आणि अधिवेशन सुरू असल्यामुळे मुहूर्त लांबणीवर पडल्याचे सूत्रांनी सांगितले. शहरातील ४ सर्कलचा समावेश नवीन तहसीलमध्ये होणार आहे. शहरातील सर्व जमिनींचे व्यवहार व सातारा-देवळाईचा समावेश यामुळे शहरी तहसीलमध्ये मोठ्या उलाढाली होतील. त्यामुळे अप्पर तहसीलदार या पदाला विशेष महत्त्व असणार आहे. शहराचा पसारा वाढत चालला आहे. एका तहसील कार्यालयावर शहराच्या कामकाजाचा ताण पडतो आहे. त्यामुळे ग्रामीण व शहर, असे दोन विभाग करण्याचा विचार पुढे आला. नवीन कार्यालय हे शहरासाठी असेल. त्यामध्ये पूर्व, पश्चिम आणि मध्य मतदारसंघांतील कामकाज असेल. नवीन तहसील कार्यालयात औरंगाबाद शहर, भावसिंगपुरा, उस्मानपुरा, कांचनवाडी या ४ सर्कलचाही समावेश असेल. जुन्या तहसीलकडे ८० गावांचे कामकाज असेल. नवीन कार्यालयात १३ कर्मचारी नवीन तहसीलसाठी अप्पर तहसीलदार, १ नायब तहसीलदार, २ अव्वल कारकून, ८ लिपिक, १ वाहनचालक, अशा १३ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे.
अप्पर तहसीलदारपदासाठी ‘लॉबिंग’
By admin | Updated: December 23, 2015 00:02 IST