लातूर : जिल्ह्यात व मांजरा प्रकल्प क्षेत्रात दोन दिवसांपासून होत असलेल्या हलक्या स्वरुपाच्या पावसामुळे किंचितसा दिलासा मिळाला आहे. परिणामी, ‘मांजरा’तील पाणीसाठ्यात ६० सें.मी.ने वाढ झाली आहे.जिल्ह्यात मंगळवारी सकाळी आणि बुधवारी दुपारी हलका पाऊस झाला. गेल्या दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात कमी-अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली आहे़ लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस सुरु आहे़ लातूर शहराच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या मांजरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्यामुळे धरणात पाणी येत आहे़ धरणाची पाणीपातळी ६० से़ंमी़ने वाढली आहे़ सध्या मांजरा धरणामध्ये मृत पाणीसाठा असून, या मृत पाणीसाठ्यात मंगळवारी सायंकाळपर्यंत ०़५ दसलक्ष घनमीटरने वाढ झाली आहे़ यंदा पावसाने पाठ फिरविल्यामुळे तीन महिने संपले तरी समाधानकारक मोठा पाऊस झाला नाही़ परिणामी, लातूर जिल्ह्यासह शहराला भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे़ त्यात लातूर शहरात २० दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे़ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा धरणात सध्या अत्यल्प पाणीसाठा आहे़ मांजरा धरणात बुधवारपर्यंत एकूण १़७१ दसलक्ष घनमीटर पाणीसाठा होता. बुधवारी रात्री ६ वाजेपर्यंत पुन्हा त्यात वाढ होऊन ६० सें.मी.ने पाणी वाढले आहे. मंगळवारी व बुधवारी झालेल्या पावसामुळे मांजरा धरणातील पाणीपातळीत ०़५ दसलक्ष घनमीटरने वाढ झाली आहे़ (प्रतिनिधी)
‘मांजरा’च्या पाणीसाठ्यात किंचित वाढ
By admin | Updated: September 10, 2015 00:31 IST