कौठा : केंद्र शासनाच्या राष्ट्रीय साक्षरता मिशन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राबविण्यात येत असलेल्या साक्षर भारत योजनेअंतर्गत अतिशय उत्साहात सुरू झालेल्या यातील प्रेरकांना मानधन मिळत नसल्यामुळे योजनेचा बोजवारा उडाला आहे.२०१० च्या जनगणनेनुसार ज्या जिल्ह्यामध्ये महिला साक्षरतेचे प्रमाण ५० टक्के किंवा त्यापेक्षा कमी आहे. अशा ३६५ जिल्ह्यात व राज्यातील जालना, परभणी, बीड, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली, लातूर, गडचिरोली, गोंदीया व नंदुरबार या दहा जिल्ह्यांत ही साक्षर भारत योजना सुरू करण्यात आली. या योजनेसाठी समावेशीत जिल्हा व तालुक्यातील गावात प्रेरक नेमणुकीसंदर्भात शिक्षण संचालक, अल्पसंख्यांक व प्रौढ शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या निर्णयान्वये प्रेरक, प्रेरकांची नियुक्ती करण्यात आली. या अध्यादेशात स्पष्ट केले आहे की, नियुक्त प्रेरक, प्रेरकांचे मानधन प्रत्येक महिन्याला बँकेमार्फत देणे बंधनकारक आहे. असे असले तरी २ जानेवारी २०१२ रोजी नियुक्त झालेल्या प्रेरकांना आतापर्यंत फक्त सुरूवातीच्या तीन महिन्यांचेच मानधन मिळालेले आहे. मागील दोन वर्षांपासून प्रेरकांना मानधनच मिळालेले नाही. या साक्षर भारत योजनेअंतर्गत समावेशित जिल्हा व तालुक्यातील निरक्षर व्यक्ती शिक्षणाच्या प्रवाहाशी जोडल्या जात आहेत. यासाठी राज्यात अनेक प्रेरक- प्रेरिका नियुक्त करण्यात आल्या आहेत; परंतु मानधनाअभावी त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. यासाठी शिक्षण विभागाकडे प्रेरक -पे्ररिका यांच्यामध्ये तीव्र असंतोष आहे. याबाबत शिक्षण विभाग वसमत येथील साक्षर भारत योजनेतील महिला साधन व्यक्ती गव्हाणे यांच्याशी संपर्क साधला असता, प्रेरकांच्या मानधनाचा प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न सुरू असून मानधनाची मागणी वरिष्ठ स्तरावर केल्याचे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)
साक्षर भारत’च्या प्रेरकांचे मानधन रखडले
By admin | Updated: August 12, 2014 01:59 IST