हिंगोली : निरक्षरांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी २०१२ पासून साक्षर भारत मिशन जिल्ह्यात राबविले जात असून तेव्हा निरक्षरांची संख्या १ लाख ११ हजार होती. आतापर्यंत निरक्षरांच्या ११ परीक्षा घेण्यात आल्यामुळे साक्षरतेचे प्रमाण टप्याटप्याने वाढत असून सध्या जिल्ह्यात ३४ हजारांच्या जवळपास निरक्षर शिल्लक आहेत. त्यांना डिसेंबर २०१७ पर्यंत साक्षर करण्याचे उदिष्ट असून आॅगस्ट २०१६ मध्ये नवसाक्षर मूलभूत चाचणी परीक्षा घेण्यात येणार आहे. राष्ट्रीय मुक्त विद्यालय संस्थेमार्फत (नोयडा) साक्षर भारत मिशनतंर्गत जिल्ह्यातील ५६५ ग्राम लोक शिक्षण समिती असलेल्या गावातील जि. प. प्राथमिक शाळेत २१६९३ नवसाक्षरांची २० मार्च रोजी परीक्षा घेण्यात आली. २०१५-१६ या शैक्षणिक वर्षात एकूण ३० हजार नवसाक्षरांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी ९ हजार ७९१ पुरूष तर ११ हजार ३०१ महिला एकूण २१ हजार ६९३ जणांनी परीक्षा दिली. सदर परीक्षा २० मार्च रोजी संबंधित जि. प. च्या प्राथमिक शाळांतून घेण्यात आली. ‘निरंतर’चे शिक्षणाधिकारी डी. आर. गुप्ता यांच्या पथकाने पंधरा परीक्षा केंद्रांना तसेच संबधित तालुक्याच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांनी भेटी देऊन पाहणी केली. सध्या जिल्ह्यात ३४ हजार ३०७ च्या जवळपास निरक्षर आहेत. त्यांना डिसेंबर २०१७ पर्यंत साक्षर करण्याचे उदिष्ट असून आॅगस्ट महिन्यात नवसाक्षर मूलभूत चाचणी परीक्षा घेण्यात येणार असल्याचे गुप्ता यांनी सांगितले. साक्षरतेसाठी जिल्ह्यात एकूण ११३० प्रेरकांमार्फत निरक्षरांना शिकविल्या जात आहे. (प्रतिनिधी)
३४ हजार निरक्षर होणार साक्षर
By admin | Updated: March 27, 2016 23:51 IST