औरंगाबाद : दोन दिवसांपूर्वी सहधर्मादाय आयुक्तांचे कार्यालय नवीन इमारतीमध्ये स्थलांतरित झाले. या इमारतीमधील सर्वसामान्यांसाठी असलेल्या लिफ्टमध्ये क्षमतेपेक्षा अधिक लोक बसल्याने त्यात बिघाड झाला आणि सुमारे ४० मिनिटे आठ जण त्यामध्ये अडकले. या सर्वांना मेकॅनिक आणि अग्निशामक दलाच्या मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात आले. ही घटना बुधवारी सकाळी सव्वाअकरा वाजेच्या सुमारासघडली.बाबा पेट्रोलपंप चौकाजवळ धर्मादाय आयुक्त कार्यालयाची चार मजली इमारत वर्षभरापूर्वी बांधण्यात आली.या इमारतीत अधिकारी आणि सर्वसामान्य नागरिकांकरिता स्वतंत्र लिफ्ट आहे. सामान्यांसाठी असलेल्या लिफ्टमध्ये सहा जणांना वाहून नेण्याची क्षमता आहे. असे असताना आज एम. ए. खादर, अब्दुल रज्जाक, डी. एस. मोरे, शेख वहीद, शेख खलील यांच्यासह आठ जण लिफ्टमध्ये बसले. यात दोन कर्मचारी होते. लिफ्ट वरच्या दिशेने चढत असतानाच त्यात बिघाड झाला आणि ती बंद पडली. त्यामुळे लिफ्टमधील नागरिक प्रचंड घाबरले. लिफ्टची वाट पाहत थांबलेल्या वरच्या मजल्यावरील नागरिकांना ही बाब समजली. त्यांनी ही बाब तातडीने कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविली. अधिकाऱ्यांनी तातडीने लिफ्टचा मेकॅनिक आणि अग्निशामक दलाला या घटनेची माहिती कळविली. मेकॅनिक आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी ४० ते ४५ मिनिटे अथक प्रयत्न करून लिफ्टमध्ये अडकलेल्या सर्वांना सुखरूप बाहेर काढले. लिफ्टमध्ये बसलेली मंडळी जेव्हा बाहेर पडली तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर सुखरूप बाहेर पडल्याचा आनंदही दिसत होता.
लिफ्टमध्ये अडकलेल्यांची सुटका
By admin | Updated: April 16, 2015 01:01 IST