औरंगाबाद : दारुड्या पतीच्या मारहाणीला कंटाळून एक वर्षापासून पत्नी गंगाबाई ऊर्फ हौसाबाई माहेरी राहत होती. तिला नांदावयास पाठवीत नसल्याच्या कारणावरून सासऱ्याचा निर्घृण खून करणाऱ्या जावयास वैजापूरचे सत्र न्यायाधीश के. ए. कोठेकर यांनी आरोपी लहानू रघुनाथ मोरे राहणार वैजापूर याला खुनाच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा आणि दोन हजार रुपये दंड ठोठावला. तसेच घरात घुसून मारहाण केल्याच्या आरोपाखाली (ट्रेसपास) तीन वर्षे सश्रम कारावास आणि एक हजार रुपये दंडसुद्धा न्यायालयाने ठोठावला आहे. आरोपीला या दोन्ही शिक्षा एकत्रितपणे भोगावयाच्या आहेत. तलवाडा, वैजापूर येथील सुभाष शहादू सोनवणे यांची मुलगी गंगाबाई ऊर्फ हौसाबाईचे १५ वर्षांपूर्वी वैजापूरमधीलच बांधकाम मजूर लहानू रघुनाथ मोरेसोबत लग्न झाले होते. त्यांना दोन मुले आणि दोन मुली आहेत. चार वर्षांपासून लहानू दारू पिऊन पत्नीला मारहाण करीत असे. या त्रासाला कंटाळून एक वर्षापासून गंगाबाई वैजापूरलगतच तलवाडा येथे तिच्या माहेरी राहत होती. २१ एप्रिल २०१४ रोजी गंगाबाईचा भाऊ तथा फिर्यादी राजू सोनवणे हा मजुरीसाठी बाहेर गेला होता. आरोपी लहानू याने राजूचे वडील (आरोपीचे सासरे) सुभाष यांना मारहाण केल्याचे गावातील मोईनुद्दीन शेख यांनी राजूला सांगितले होते. त्यावरून राजू घरी गेला असता त्याचे वडील सुभाष सोनवणे (५५) हे गंभीर जखमी झालेले बेशुद्धावस्थेत पडलेले आढळले. त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागलेला होता. तसेच डावा हात कोपरापासून मोडलेला होता. सदर घटनेनंतर शेजारी राहणाऱ्या शकीलाबी शेख युनूस आणि वाहनचालक शेख अमजद शेख सलीम यांनी आरोपीला हातात वीट घेऊन घराबाहेर पडताना पाहिले. त्यांनी आत जाऊन पाहिले असता सुभाष वरीलप्रमाणे गंभीर जखमी अवस्थेत पडल्याचे त्यांना दिसले. त्यांच्याजवळ रक्त लागलेली काठी, दगड आणि विटा पडल्याचे त्यांनी पाहिले. या प्रकरणी राजू सोनवणे यांच्या फिर्यादीवरून आरोपी लहानूविरुद्ध शिऊर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक डी. बी. जाधव यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सुनावणीच्या वेळी अतिरिक्त लोकअभियोक्ता बाळासाहेब महेर यांनी एकूण १० साक्षीदारांचे जबाब नोंदविले. न्यायालयाने आरोपीला वरीलप्रमाणे शिक्षा व दंड ठोठावला.
सासऱ्याचा खून करणाऱ्या जावयास जन्मठेप
By admin | Updated: October 17, 2016 01:12 IST