औरंगाबाद : एस.टी. महामंडळाने अपघात निधीच्या ५ रुपयांसाठी मध्यवर्ती कारागृह आणि पोलीस मुख्यालय (ग्रामीण) यांना चक्क पत्र दिले आहे. प्रवासादरम्यान टाळलेली ही रक्कम भरून सहकार्य करण्याचे या पत्रात करण्यात आले आहे.एस. टी. महामंडळाच्या बसगाड्यांच्या अपघातांमध्ये प्रवासी मृत झाल्यास त्याच्या वारसांना तसेच जखमींना यापुढे पूर्वीच्या तुलनेत वाढीव रकमेची मदत केली जाणार आहे. त्यासाठी अपघात सहायता निधी योजना राबविण्यात येत आहे. त्यासाठी महामंडळातर्फे १ एप्रिलपासून अपघात सहायता निधी योजना सुरू करण्यात आली. या योजनेंतर्गत प्रवाशांकडून प्रवास भाड्याव्यतिरिक्त १ रुपया अतिरिक्त आकारण्यात येत आहे. १२ जुलै रोजी मध्यवर्ती बसस्थानकाचे वाहक एस.जी.गवळी हे पैठण-औरंगाबाद बसमध्ये कर्तव्यावर होते. यावेळी वॉरंटवर प्रवास करणाऱ्या पोलिसांकडे त्यांनी अपघात निधीचे ५ रुपये मागितले. तेव्हा पोलीस कर्मचाऱ्यांनी ही रक्कम देण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांच्यात शाब्दिक वाद झाला.ही रक्कम न मिळाल्याने नाईलाजाने गवळी यांनी स्वत: या रकमेचे तिकीट काढले. याविषयी त्यांनी ‘एसटी’च्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. वॉरंटवर प्रवास करणाऱ्या पाच जणांपैकी दोन जण हे मध्यवर्ती कारागृह तर तीन जण पोलीस मुख्यालय (ग्रामीण) कार्यक्षेत्रातील आहेत. त्यामुळे महामंडळाने कारागृह अधीक्षक आणि राखीव पोलीस निरीक्षक यांना पत्राद्वारे या रकमेची मागणी केली आहे.
कारागृह अन् पोलीस मुख्यालयास पाच रुपयांसाठी ‘एसटी’ चे पत्र
By admin | Updated: August 10, 2016 00:27 IST