जाफराबाद : जाफराबाद तालुका विधानसभा मतदार संघामध्ये येणाऱ्या गावा गावात राष्ट्रवादी पक्षाची ताकद वाढविण्यासाठी येणाऱ्या काळात कार्यकर्त्यांच्या हाताला काम द्या, अशी मागणी करण्यात आली आहे. आ. चंद्रकांत दानवे यांच्या उपस्थितीत रविवारी येथील शासकीय विश्रामगृहामध्ये विकास आढावा बैठक घेण्यात आली. त्याप्रसंगी कार्यकर्त्यांमधून सूर निघाला आहे.विधानसभा मतदार संघामध्ये विविध विकास कामासाठी आ. चंद्रकांत दानवे यांच्या विशेष प्रयत्नातून ग्रामविकास विभागांतर्गत पंचवीस, पंधराच्या माध्यमातून जवळपास पंधरा कोटी रुपये निधी उपलब्ध केला असल्याचा दावा केला आहे. सदरील निधी गावनिहाय कसा खर्च करायचा या विषयी आढावा बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. मात्र, विकासकामे करताना कार्यकर्त्यांचे देखील आर्थिक बळ वाढले पाहिजे, यासाठी इतरांना मोठे करण्यापेक्षा कार्यकर्त्यांना मोठे करा, असा सूर तालुका पदाधिकारीसह कार्यकर्ते यांनी आळवला आहे.विधानसभेची निवडणूक तीन महिन्यावर आली असून, रंगीत तालीम सुरू झाली आहे. अशात कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडायच की, त्यांच्या हाताला काम द्यायच असा प्रश्न आ. चंद्रकांत दानवे यांच्यासमोर उभा आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये जाफराबाद तालुक्यामध्ये महायुतीला जवळपास १५ हजारांचे मताधिक्य जास्तीचे मिळाले आहे. त्यामुळे विकासाचे तारे जमीनपर येणे हे राष्ट्रवादीसाठी तितकेच महत्त्वाचे आहे. भाजपा महायुतीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांचे मनोबल खचलेले आहे. अशात विकासाची बळकटी, काँग्रेसची साथ महत्त्वाची असणार आहे.झालेल्या बैठकीचा परिणाम होईल, अशी अपेक्षा देखील कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. त्यामुळेच गावाच्या कार्यकर्त्याला गावातच काम दिले जाईल, असे देखील आ. दानवे यांनी चर्चेदरम्यान सांगितले आहे. या बैठकीस ता.अध्यक्ष सुधीर पाटील, सुधाकर दानवे, माजी सभापती राजेश चव्हाण, शहराध्यक्ष शेख कौसर, पं.स.सदस्य रामभाऊ दुनगहू, जगन्नाथ भोपळे, दत्तू पंडित, सर्जेराव शिंदे, राजू सोनवणे, राजू जाधव, साहेबराव लोखंडे यांची उपस्थिती होती.
कार्यकर्त्यांच्या हाताला काम द्या
By admin | Updated: June 25, 2014 01:06 IST