धावडा : दुष्काळाची दाहकता व पाण्याची टंचाई दिवसेंदिवस वाढत चालली असून पाण्याच्या शोधात वन्यप्रमाणी गाव-वस्त्यांकडे फिरत आहेत. १० मेच्या मध्यरात्री धावडा येथील लिलाबाई गवळी यांच्या शेतात (गट नं. ५७) मेहगाव शिवारातील शेतात जवळपास ३५ जनावरे बांधलेली असताना त्यातून एका गायीवर बिबट्याने हल्ला करुन तिचा फडशा पाडला.या हल्ल्याने भयभीत झालेली सदर ३४ जनावरांनी भडकून दावे तोडून जंगलात पळ काढला. सदर घटना रात्री दीडला घडली. छपरात झोपलेले आत्माराम गवळी व त्यांच्या मुलाला जनावराच्या आरडाओरडीने जाग आल्याने त्यांनी जनावरे जागेवर न दिसल्याने शोध सुरु केला. सर्व जनावरे एकत्र केली तेव्हा त्यांना गाय बिबट्याने ठार मारल्याचे दिसून आले. त्यांनी सकाळी वन रक्षक दिलीप जाधव यांना कळविले. जाधव व युराज टेलर यांनी घटनास्थळाला भेट देवून पंचनामा केला. पारधच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी गायीची उत्तरीय तपासणी करुन वनरक्षक व पशु वैद्यकीय अधिकारी जोशी यांना अहवाल सादर केला. २० हजार रुपये किंमतीची गाय बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, या हल्ल्यामुळे शेतकरी भयभीत झाले आहेत. (वार्ताहर)
बिबट्याने गायीचा फडशा पाडला
By admin | Updated: May 12, 2016 00:32 IST