औरंगाबाद : भौतिक साधन संपत्तीपेक्षा आरोग्य संपन्न देश हाच जगाची महासत्ता बनू शकतो, असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे नवनियुक्त सदस्य डॉ. देवानंद शिंदे यांनी केले. राष्ट्रीय सेवा योजना व गांधी अध्यासन केंद्रातर्फे आयोजित व्याख्यानात डॉ. शिंदे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉ. सतीश बडवे होते. व्यासपीठावर राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक डॉ. राजेश करपे व गांधी अध्यासन केंद्राचे संचालक डॉ. दासू वैद्य यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डॉ. शिंदे म्हणाले की, या देशातील नागरिकांनी पैसा हा केंद्रस्थानी न ठेवता आरोग्याला जास्त महत्त्व देणे गरजेचे आहे. अध्यक्षीय समारोप करताना डॉ. बडवे म्हणाले की, मराठी साहित्यावर गांधीवादाचा मोठा प्रभाव असून, गांधीजींच्या हिंद स्वराज्य या ग्रंथामध्ये देशीवादाची मुळे सापडतात. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. दासू वैद्य यांनी केले, तर सुरेश शिरसाट यांनी सूत्रसंचालन केले. आभार डॉ. राजेश करपे यांनी मानले. कार्यक्रमास मराठी विभागाचे प्रा. प्रल्हाद लुलेकर, इंग्रजी विभागाचे प्रा. भीमराव भोसले, प्रा. उत्तम अंभोरे, प्रा. विलास इप्पर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
विद्यापीठात व्याख्यान
By admin | Updated: October 7, 2014 00:45 IST