औरंगाबाद : चाचणीत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना लवकरच तात्काळ ‘लर्निंग लायसन्स’ दिले जाणार आहे. त्यामुळे उमेदवार शिकाऊ परवान्यासह आरटीओ कार्यालयाबाहेर पडतील. यादृष्टीने नियोजन करण्यात येत असून, आठ दिवसांत त्याची अंमलबजावणी होईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.आरटीओ कार्यालयात चाचणी दिल्यानंतर लर्निंग लायसन्स मिळविण्यासाठी दोन ते तीन दिवस प्रतीक्षा करण्याची वेळ उमेदवारांवर येत आहे. आरटीओ कार्यालयात नव्या प्रणालीवर आधारित आॅनलाईन कामकाजाची पद्धत २० आॅक्टोबरपासून सुरू झाली. यामध्ये लर्निंग लायसन्सची प्रक्रि या सारथी १.० मधून सारथी ४.० मध्ये बदलण्यात आली आहे. त्यामुळे अर्ज भरणे, आवश्यक कागदपत्रे स्कॅन करणे, अपलोड करणे, अपॉइंटमेंट घेणे तसेच शुल्क भरणे आदी कामे आॅनलाईन झाली आहेत. नव्या प्रणालीत लर्निंग लायसन्ससाठी १०० जणांना अपॉइंटमेंट दिली जात आहे. अपॉइंटमेंट घेताना उमेदवार आवश्यक ती कागदपत्रे आॅनलाईन अपलोड करतात. कागदपत्रे अपलोड केल्यानंतरही उमेदवार झेरॉक्स कागदपत्रे कार्यालयात जमा करण्यासाठी घेऊन येतात. परंतु त्याची आवश्यकता नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे कार्यालयात पेपरलेस कामकाज होण्यास मदत होत आहे. अपॉइंटमेंटच्या दिवशी आरटीओत आल्यानंतर उमेदवारांना बायोमेट्रिक, अपलोड झालेल्या कागदपत्रांची पडताळणी, चाचणी अशा प्रक्रियेला सामोरे जावे लागते. मोटार वाहन निरीक्षकांना केवळ उमेदवारांनी अपलोड केलेली कागदपत्रे योग्य आहेत की नाही, याची पडताळणी करावी लागत आहे. या सर्व प्रक्रियेनंतर आणि प्रत्यक्ष चाचणी दिल्यानंतरही आजघडीला उमेदवारांना लायसन्स मिळविण्यासाठी कार्यालयात चकरा माराव्या लागतात. परंतु आगामी आठ दिवसांत या सर्व कामकाजात सुधारणा करून चाचणीत उत्तीर्ण उमेदवार तात्काळ लर्निंग लायसन्स घेऊन बाहेर पडतील, यासाठी विविध प्रक्रियांचे पाच टप्पे राहतील. असे नियोजन करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.दुचाकींनाही तात्काळ नंबरआरटीओ कार्यालयात सारथी ४.० बरोबरच वाहन ४.० कार्यान्वित करण्यात आले. त्यामुळे लर्निंग लायसन्ससह नव्या वाहनांच्या नोंदणीचे कामही आॅनलाईन पद्धतीने केले जात आहे. त्यामुळे वाहन वितरकांना या नव्या प्रणालीद्वारे कामकाज करावे लागत आहे. या नव्या प्रणालीमुळे कार्यालयातील कामकाजात होणारे बदल आता दिसण्यास सुरुवात होत आहे. पूर्वी वाहन विक्रीनंतर नंबर मिळण्यास अनेक दिवस प्रतीक्षा करण्याची वेळ वाहनधारकांवर येत होती. परंतु नव्या प्रणालीमुळे सर्व प्रक्रिया सुरळीत पार पडल्यावर तात्काळ नंबर मिळत आहे. अनेक वितरकांना दुचाकीचे नंबर दोन तासांत मिळत असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी सर्जेराव शेळके यांनी सांगितले. आगामी ८ दिवसांत लर्निंग लायसन्सच्या चाचणी प्रक्रियेत बदल दिसेल. उत्तीर्ण होणारा उमेदवार लायसन्स घेऊनच बाहेर पडेल, असे नियोजन करण्यात आले आहे. शिवाय उमेदवारांना चाचणी देणे सोपे व्हावे, यासाठी रस्ते सुरक्षेसंदर्भात माहिती देण्यासाठी टीव्ही लावण्यात येत आहे.-श्रीकृष्ण नखाते, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी
लर्निंग लायसन्ससोबतच उमेदवार आरटीओ बाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2016 01:34 IST