औरंगाबाद : कोरोनाबाधित गंभीर रुग्णांना ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात गरज भासत आहे. महापालिकेचा चिकलठाणा येथील बेल्ट्रोन हॉस्पिटलमध्ये गुरुवारी ऑक्सिजन प्लांटच्या पायाभरणीस सुरुवात करण्यात आली. अवघ्या पंधरा दिवसांमध्ये काम पूर्ण होणार असून, त्यानंतर रुग्णालयातील तब्बल २५० बेडवर ऑक्सिजनची व्यवस्था होईल. सध्या १२० बेडवर ऑक्सिजनची व्यवस्था आहे.
मागील वर्षी सप्टेबर-ऑक्टोबर महिन्यात शहरात कोरोनाबाधितांसाठी ऑक्सिजन बेड मिळत नव्हते. याची दखल घेत पालकमंत्री सुभाष देसाई यांनी मेल्ट्रॉन येथील कोविड केअर सेंटरसाठी स्वतंत्र ऑक्सिजन प्लांट उभारण्याची घोषणा केली. जिल्हा प्रशासनाने निधी देण्यात हात आखडता घेतला. चार कोटी ५० लाख रुपयांचा निधी मिळावा, अशी मागणी महापालिकेकडून जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली होती. निधी उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे पत्र जिल्हा प्रशासनाने अलीकडेच महापालिकेला दिले. पण केवळ पत्राच्या आधारे काम सुरू करण्यास महापालिकेने नकार दिला. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने गेल्या महिन्यात मनपाला साडेचार कोटी रुपयांचा निधी दिला. निधी मिळाल्यावर मनपाने कंत्राटदाराला वर्क ऑर्डर दिली. त्यानंतर कंत्राटदाराने ऑक्सिजन प्लांटच्या उभारणीचे काम सुरू केले. ऑक्सिजन प्लांट उभारण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. २० केएलचे दोन टँक उभारले जाणार आहेत. १५ दिवसात पायाभरणी करून टॅंक उभारण्यात येतील. या टॅंकमधूनच चार कोविड सेंटरला ऑक्सिजनचा पुरवठा केला जाईल.