जालना : शहरासह जिल्ह्यात लक्ष्मीपूजन अत्यंत उत्साहात व पारंपरिक पद्धतीने पार पडले. निवासस्थाने तसेच व्यावसायिक प्रतिष्ठानांमध्ये रविवारी सायंकाळनंतर लक्ष्मीपूजन करून लक्ष्मीची आराधना करण्यात आली. त्यानंतर आतषबाजी करण्यात आली. तर अनेक ठिकाणी प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचा संकल्प करण्यात आल्याने यालाही चांगला प्रतिसाद मिळाला. दिव्यांचा मंद प्रकाश व आतषबाजीने अवघा आसमंत उजळून निघाला होता. वसूबारसपासून दीपावलीस प्रारंभ झाला. रविवारी पहाटे अभ्यंगस्रान तर सायंकाळनंतर ठिकठिकाणी अत्यंत पारंपरिक उत्साहात लक्ष्मीपूजन पार पडले. जालना शहर व परिसरात रात्री उशिरापर्यंत फटाक्यांची आतषबाजी सुरू होती. विविध प्रकारचे फटाके, आकाशात उडणाऱ्या विविध रंगांच्या रॅकेटमुळे अनेकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. अनेकांनी फटाके न फोडता प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी केली. यार्षी अनेक शाळांतून विद्यार्थ्यांनी फटाके न फोडण्याची प्रतिज्ञा घेतल्याने अनेकांनी त्याचे पालन केल्याचे दिसून आले. (प्रतिनिधी)
जिल्ह्यात लक्ष्मीपूजन उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2016 00:11 IST