औरंगाबाद : सूर्यास्त होताना संपूर्ण शहर विद्युत रोषणाईत उजाळून निघाले होते... घराघरांवर लावलेले आकाशकंदिल, असंख्य पणत्या, दिव्यांचा मंद प्रकाश... इमारतीवर करण्यात आलेल्या विद्युत माळांचा लखलखाट डोळे दिपवणारा ठरला. अशा तेजोमय वातावरणात लहान-थोरांच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने लक्ष्मीपूजन करून सर्वांनी समृद्धी, निरोगी आरोग्य, शांतीसाठी प्रार्थना केली.सणामध्ये महासण म्हणजे दिवाळी होय. त्यात बुधवारी (दि.७) लक्ष्मीपूजनाचा दिवस सर्वात महत्त्वाचा. धनसंपत्ती, समृद्धी लाभण्यासाठी लक्ष्मीची या दिवशी भक्तिभावाने पूजा करण्यात आली. लक्ष्मीपूजनासाठी रात्री ८.३० ते ११.३० वाजेचा मुहूर्त होता. अनेकांनी मुहूर्तावरच लक्ष्मीपूजन केले. पारंपरिक पद्धतीने पूजा करण्याकडे अनेकांचा कल होता. विधिवत पूजा करण्यासाठी अनेकांनी पुरोहितांना आमंत्रित केले होते. पूजेमध्ये मध्यभागी कोणी लक्ष्मीची, तर कोणी लक्ष्मी, गणेश, कुबेराच्या मूर्ती ठेवल्या होत्या. फुलांची सजावट करण्यात आली होती. नेहरू शर्ट, पायजमा, पांढरी टोपी अशा पारंपरिक वेशभूषेत पूजा केली. पूजेनंतर गणपती, लक्ष्मीची आरती झाली आणि नंतर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत अनेक जण एकमेकांच्या घरी जाऊन लक्ष्मीचे दर्शन व ज्येष्ठांच्या पाया पडून आशीर्वाद घेताना दिसून आले. यानिमित्ताने संपूर्ण शहरात मंगलमय वातावरण निर्माण झाले होते. बच्चेकंपनीही फॅशनेबल कपडे परिधान करून या आनंदोत्सवात सहभागी झाले होते. यानिमित्ताने परिवारातील सदस्य एकत्र आले होते. रात्री उशिरापर्यंत गोडधोड जेवण, फराळाची मेजवाणी सुरू होती. अनेक मंदिरांवरही आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. हनुमान टेकडी, सातारा परिसरातील टेकडी, तसेच शहरातील उंच इमारतींवरून शहराचे रात्रीच्या लखलखाटाचे विहंगम दृश्य अनेकांनी आपल्या कॅमेऱ्यात टिपले. एक अविस्मरणीय सायंकाळ शहरवासीयांनी अनुभवली.चौकटझेंडू कुठे १५ रुपये, तर कुठे ५० रुपये किलोशहरात सिडको-हडको भागात सकाळी १५ रुपये, तर शहरात काही भागात ५० रुपये किलोने झेंडू विक्री झाला. दुपारनंतर झेंडूचे भाव वाढल्याचे दिसले. पूजेसाठी झेंडूसोबत शेवंती, गलेंडा, गुलाबाची चांगली विक्री झाली.
शहरवासीयांचे जल्लोषात लक्ष्मीपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2018 23:20 IST
औरंगाबाद : सूर्यास्त होताना संपूर्ण शहर विद्युत रोषणाईत उजाळून निघाले होते... घराघरांवर लावलेले आकाशकंदिल, असंख्य पणत्या, दिव्यांचा मंद प्रकाश... ...
शहरवासीयांचे जल्लोषात लक्ष्मीपूजन
ठळक मुद्देदिवाळी : फटाक्यांपेक्षा सजावट, पूजेवर अधिक लक्ष