महेश पाळणे , लातूरउत्कृष्ट लवचिकता, अप्रतिम संतुलन व खेळातील जिद्दीच्या बळावर लातूरच्या विजय हणमंत हडगिले याने अवघ्या १५ व्या वर्षात आंतरराष्ट्रीय योगा स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. प्रतिकुल परिस्थितीवर मात करीत विजयने मिळविलेले यश वाखाणण्याजोगे आहे. मूळचा लातूर तालुक्यातील खंडापूर येथील रहिवासी असलेला विजय हडगिले चिंचोलीराववाडी येथील मांजरेश्वर हनुमान विद्यालयात दहावीचे शिक्षण घेत आहे. प्रचंड इच्छाशक्ती व जिद्दीच्या बळावर त्याने योगा खेळात लातूरचे नाव उज्ज्वल केले आहे. नुकत्याच बिजींग येथे झालेल्या पाचव्या आंतरराष्ट्रीय योगा चॅम्पियनशीप स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करीत त्याने पाचवे स्थान मिळविले. तत्पूर्वी दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय योगा स्पर्धेत सातवी रँक प्राप्त केली होती. बंगळुरु येथे योगा डेनिमित्त झालेल्या आंतरराष्ट्रीय योगा स्पर्धेतही त्याने रौप्यपदक पटकाविले होते. यासह शालेय स्पर्धेतील राज्य स्पर्धेत चमकदार कामगिरी करीत लातूरचे नाव उज्ज्वल केले आहे. वडील कुस्तीपटू. भाऊ अजय योगाचा राष्ट्रीय खेळाडू. याचीच कास धरीत विजयने योगात कमी वयात उत्तुंग भरारी घेतली आहे. वडील अल्पभूधारक शेतकरी. घरची परिस्थिती साधारण असतानाही विजयने मिळविलेले यश नक्कीच प्रेरणादायी आहे.
योगात लातूरचा ‘विजय’ चमकला
By admin | Updated: September 10, 2015 00:31 IST