महेश पाळणे , लातूर किक् बॉक्सिंग खेळात लातूरच्या तिघा क्रीडापटूंनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर लातूरचा झेंडा अटकेपार रोवला आहे. नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय किक् बॉक्सिंग स्पर्धेत नबीजी फरहान, हिना शेख व शोएब सय्यद या तिघांनी पदकांची कमाई करून इतिहास रचला आहे. पुण्यातील बालेवाडी येथे झालेल्या एशियन किक् बॉक्सिंग चॅम्पियनशीप स्पर्धेत लातूरच्या या खेळाडूंनी दोन सुवर्ण व एक कांस्य पदक पटकाविले. नबीजी फरहानने वरिष्ठ गटातील किक् लाईट प्रकारात ६९ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकाविले. हिना शेखने वरिष्ठ गटात किक् लाईट प्रकारात ६० किलो गटात सुवर्णपदक पटकाविले असून ५७ किलो गटात शोएब सय्यदने कांस्यपदक पटकाविले. लातूरच्या नाना-नानी पार्कजवळील लोकमान्य टिळक विद्यालयात हे तिघेही नियमित लातूर जिल्हा किक् बॉक्सिंग संघटनेमार्फत प्रशिक्षक अबु चाऊस व खय्युम तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतात. प्रतिकुल परिस्थितीवर मात करीत या तिघांनी किक् बॉक्सिंग खेळात आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळविले आहे. राज्य व राष्ट्रीय स्पर्धेतही या तिघांनी चमकदार कामगिरी करीत लातूरचे नाव दूरवर पोहोचविले आहे. नबीजीची बॅक किक् व नॉकआऊट पंच हे कौशल्य त्याची ताकद आहे. तर हिनाची प्रेस किक्, बॅक किक् व डॉज या बाबीत ती माहीर आहे. तर शोएबच्या स्पिनिंग किक् व राऊंडअप किक् प्रतिस्पर्धी खेळाडूंना घायाळ करतात. अशा या तिघांच्या कौशल्याची या खेळात दादागिरी आहे म्हणायला हरकत नाही. या जोरावरच त्यांनी आंतरराष्ट्रीयस्पर्धेत आपली छाप सोडली आहे.
किक् बॉक्सिंगमध्ये लातूरचे ‘थ्री स्टार’
By admin | Updated: September 13, 2015 00:06 IST