लातूर : आडत बाजारातील एका व्यापाऱ्यावर रविवारी हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. त्याच्या निषेधार्थ सोमवारी आडत मालक, व्यापारी व हमाल-मापाड्यांच्या वतीने बंद पाळण्यात आला. संबंधितावर कारवाई करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी बेमुदत आडत बाजार बंद ठेवण्याचा निर्णय आडत व्यापाऱ्यांनी घेतला आहे. लातुरातील आडत व्यापारी संजय हरिश्चंद्र घार यांच्यावर रविवारी सायंकाळी चौघा जणांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मागच्या कार्यक्रमाला तुम्ही पैसे दिले नाहीत. या कार्यक्रमाला तरी द्या, अशी मागणी करीत हल्ला करण्याचा प्रयत्न केला, असे आडत व्यापारी घार यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आडत व्यापाऱ्यांनी सोमवारी आडत बाजार बंद ठेवला. जोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंत आडत बाजार बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णयही आडत व्यापारी असोसिएशनच्या वतीने घेण्यात आला आहे. बाजार समितीच्या सचिवांना तसे पत्रही देण्यात आले आहे. दरम्यान, गांधी चौक पोलिसात चौघा जणांनी धाक दाखवून मारहाण करण्याचा प्रयत्न केला असल्याची तक्रार आडत व्यापारी संजय घार यांनी दिली आहे. हल्ला केल्याच्या कारणावरून आडत बाजार सोमवारी बंदच होता. सौदाही निघाला नाही. संबंधितावर जोपर्यंत कारवाई केली जात नाही, तोपर्यंत आडत बाजार बेमुदत बंद ठेवणार असल्याचे पत्रकारांशी बोलताना घार यांनी सांगितले. (प्रतिनिधी)मागच्या कार्यक्रमाला पैसे दिले नाहीत, आता २५ हजार द्या म्हणून तलवारीचा धाक दाखविल्याची फिर्याद व्यापारी संजय घार यांनी गांधी चौक पोलिसात दिली आहे. त्यानुसार रवि सहदेव रोंगे व अन्य दोघांविरुद्ध कलम ३८४, ५०६, ३४, २५ (५) भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी रवि रोंगे यास पोलिसांनी अटकही केली आहे.
लातूरचा आडत बाजार बेमुदत बंद
By admin | Updated: May 26, 2015 00:48 IST