उदगीर : उदगीर शहरातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर येथील तरुण व्यापाऱ्यांनी पुढाकार घेवून पालिकेच्या मालकीच्या बनशेळकी तलावातून गाळ उपसा सुरु केला आहे़ लोकसहभागातून सुरु असलेल्या या कामाला निधीचा तुटवडा जाणवत होता़ ही बाब लक्षात घेवून रविवारी तलावास प्रत्यक्ष भेट देवून लातूरचे उद्योजक निलेश ठक्कर यांनी १ लाख तर माळवदकर यांनी २१ हजार रुपयांची मदत दिली़उदगीर नगर परिषदेची मूळ पाणीपुरवठा योजना असलेला बनशेळकी तलाव यावर्षी पूर्णपणे कोरडा पडला आहे़ त्यामुळे प्रथमच या तलावात साचलेल्या गाळाचा अंदाज काढण्यात आला़ जवळपास ७ ते १० फुटापर्यंत हा गाळ साचलेला असल्याने पाणीसाठवण क्षमता मोठ्या प्रमाणात घटली आहे़ ही बाब लक्षात घेवून उदगीरच्या तरुण व्यापाऱ्यांनी लातूरकरांकडून प्रेरणा घेत या तलावातील गाळ उपश्याला लोकसहभागातून सुरुवात केली़ ५ मे रोजी पासून सुरु झालेले हे काम अव्याहतपणे सुरुच आहे़ दरम्यान, या कार्याला निधीची टंचाई जाणवू लागली़ तरीही तरुणांनी दारोदार जावून अगदी ५०० रुपयांपासूनची मदत या कामासाठी स्विकारली़ केवळ निधीअभावी काम बंद पडू दिले नाही़ त्यांची ही धडपड पाहून रविवारी लातूरचे उद्योजक निलेश ठक्कर, माळवदकर, अजय गोजमगुंडे, चंद्रकांत झेरीकुंटे यांनी बनशेळकीच्या तलावास भेट देवून कामाची पाहणी केली़ त्यानंतर कामाला गती मिळावी, यासाठी लगेचच ५० हजार रुपयांचा धनादेश जागेवर दिला़ तसेच सोमवारी आणखी ५० हजार रुपये पाठवून दिले़ सोबतच माळवदकर यांनीही २१ हजार रुपयांची मदत केली़ त्यांच्या या सहकार्याने भारावून गेलेल्या उदगीरच्या तरुणांनी लातूर मोठ्या भावाची भूमिका पार पाडत असल्याची भावना व्यक्त केली़ आता पावसाळा तोंडावर आला असल्याने येथील कामाला जास्तीत-जास्त गती प्रदान करण्यात आली आहे़ त्यात आता नगरपालिकेनेही गेल्या तीन दिवसांपासून तलावात मशिनने चर काढण्याचे काम हाती घेवून बळ दिले आहे़ (वार्ताहर)
उदगीरकरांच्या मदतीला लातूर
By admin | Updated: May 23, 2016 23:49 IST